बामणी गावात घरातील वस्तूंपासून ते घराची सफाई

दिगंबर शिंदे, सांगली</strong>

महापुराने नदीकाठच्या गावातील घरा-घरात पाण्याबरोबर गाळमातीही शिरली. गावा-गावात सार्वजनिक स्वच्छता सामाजिक कार्यकत्रे, स्वयंसेवी संस्था करीत आहेत. मात्र एखाद्या घरातील स्वच्छतेचे काम तातडीने करून पुन्हा संसार मांडणे महिलेच्या आवाक्याबाहेरचे काम आहे. हे महिलांचे दुख ओळखून कन्या महाविद्यालयाच्या मुलींनी मिरज तालुक्यातील बामणी गावातील पूरग्रस्तांच्या घरातील चिखल काढण्यापासून ते चिखलाने माखलेली भांडी धुण्यापर्यंत श्रमदान करून नव्याने संसार मांडण्यास मदत केली.

मिरजेतील कन्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा विभागातील विद्यार्थ्यांनी पूरबाधित  बामणी गावामध्ये स्वच्छता मोहीम राबवून पूरग्रस्थ ग्रामस्थांना मदतीचा हात देऊ केला. पुरामुळे गावातील रस्त्यावर अस्वच्छता निर्माण झाली होतीच, पण घरा-घरात पुराचे पाणी व गाळमाती शिरल्याने चिखल निर्माण झाला होता. रस्ते, शाळा, अंगणवाडी येथील कचरा हटविण्यात आला.  स्वयंपाक घरात साचलेला चिखल दूर करण्यात आला, तर चिखलाने माखलेली भांडीही स्वच्छ केली.  घरोघरी जाऊन विद्यार्थिनींनी घरातील स्वच्छता करणे, सामान लावण्यास मदत करणे, झाडू मारून परिसर स्वच्छ करणे, कचरा ट्रॅक्टरमध्ये भरून तो बाहेर काढणे, भांडी घासून ती लावून देणे, याचबरोबर महिलांना मानसिक आधार देऊन समुपदेशन करण्याचे काम केले.

परिसराच्या स्वच्छतेनंतर मौजे कोळे (ता. कराड) ग्रामस्थांनी पाठवलेले गहू, ज्वारी, तांदूळ, साखर अशा जीवनोपयोगी साहित्याचे ११० किट, लहान मुलांचे कपडे व ५०० साडय़ांचे वाटप ग्रामस्थांना करण्यात आले.  या वेळी बामणीचे विद्यमान सरपंच अनसूया राउत, उपसरपंच कविता पाटील, पोलीस पाटील रफिक पटेल, ग्रामविकास अधिकारी  एस. व्ही. कुलकर्णी, तलाठी एस. पी. कांबळे, जय हनुमान उत्सव मंडळाचे सदस्य व समस्त ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  या मोहिमेत  प्राचार्य राजू झाडबुके, पर्यवेक्षिका डॉ.सुनीता माळी,  प्रा.डॉ.सागर लटके-पाटील,  प्रा. तुषार पाटील, एन. सी. सी. विभाग प्रमुख प्रा. नलिनी प्रज्ञासूर्य, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.बी.एम.सरगर सहभागी झाले होते.