कराड परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमणाच्या विळख्याला उखडून टाकण्यासाठी शहर पोलिसांनी नगरपालिकेच्या सहकार्याने जोरदार मोहीम राबवत रस्त्यावरील दुकानदारी पिटाळण्यास सुरुवात केली आहे. आज शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाक्यापासून ते दत्त चौकमार्गे तहसील कचेरीपर्यंतचा रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यात या मोहिमेला यश आले. परंतु ही मोहीम सरसकट संपूर्ण शहर परिसरात यशस्वी राबवली जाणार का अशी शंका व्यक्त केली जात असून, पोलिसांसमोर हेच आव्हान असल्याचे म्हणावे लागेल.
मोहिमेत पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांचे पथक कंबर कसून होते. पालिकेच्या टीमनेही पोलिसांना सहकार्य केले. पोलीस व पालिकेच्या संयुक्त कारवाईत कोल्हापूर नाका ते दत्त चौकदरम्यान रस्त्याकडेची सर्व अतिक्रमणे हटवण्यात आली. रस्त्यावर अडथळा ठरणारे बोर्ड, हातगाडे, दुकानांची शेड्स डंपरमध्ये टाकताना रस्त्याकडेचे व्यापारी यांचा संपूर्ण बाजार पिटाळण्यात आला. रस्त्याकडेला व्यापार मांडणाऱ्यांनी आपल्या बैठकीची व्याप्ती आघळपघळ केल्यानेच लोकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. पदभ्रमंती करणा-या नागरिकांना तर वाहतुकीची कोंडी आणि रस्त्याकडेच्या अतिक्रमणामुळे चालताना कसरतच करावी लागत होती. तर काही ठिकाणी रस्त्याकडेच्या अतिक्रमणामुळेच वाहतुकीची कोंडी होत असल्याचे दिसून येत होते. परिणामी, पोलिसांची अतिक्रमणमुक्त रस्ते या मोहिमेचे कराडकरांकडून स्वागत होत असून, संपूर्ण शहर परिसरात निष्पक्षपातीपणे ही मोहीम राबवली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.