मुंबईतील ससून डॉकच्या धर्तीवर रायगडातील करंजा आणि जिवना बंदर इथे सुसज्ज मासेमारी बंदरे विकसित करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र बंदरांच्या कामाला अद्याप सुरुवात होऊ शकलेली नाही. जिल्ह्य़ाला एकतरी सुसज्ज मासेमारी बंदर द्या, अशी मागणी मच्छीमारांकडून केली जात आहे.
 कोकण किनारपट्टीवर मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असला तरी सुसज्ज मासेमारी बंदरांची मात्र कोकणात वानवा आहे. रायगड जिल्ह्य़ाला २१० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे पण संपुर्ण जिल्ह्य़ात एकही सुसज्ज मासेमारी बंदर उपलब्ध नाही व त्यामुळे श्रीवर्धन मुरुडपासूनच्या मच्छीमारांना मासेविक्रीसाठी मुंबईतील ससून डॉक बंदरापर्यंतचा प्रवास करावा लागतो आहे. यासाठी प्रत्येक खेपेला मच्छीमारांना तब्बल १४० ते १५० लिटर डीझेल खर्च करावे लागते आहे.
राज्यसरकारने ससून डॉकच्या धर्तीवर रायगड जिल्ह्य़ातील उरण तालुक्यातील करंजा इथे तर श्रीवर्धन तालुक्यातील जिवना इथे सुसज्ज मासेमारी बंदर उभारण्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही या मच्छीमार बंदरांच्या कामाला सुरुवात होऊ शकलेली नाही. २०११-१२ मध्ये कंरजा इथे मासेमारी बंदर विकासाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून बंदर विकासासाठी ७७ कोटी ७३ लाख ४९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात मासे उतरवण्यासाठीचे लॅण्डिंग पॉइंट, मत्स्यप्रक्रिया केंद्र उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या बंदरामुळे रायगड जिल्ह्य़ातून मासे निर्यातीलाही प्रोत्साहन मिळू शकणार आहे. मात्र निधी मंजूर असला तरी कामाला सुरुवात झाली नाही.  
श्रीवर्धन तालुक्यातील जिवना बंदराचीही हीच परिस्थिती आहे. मत्स्यव्यवसाय बंदराच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र आता इथल्या बंदर विकासाच्या कामाला गती देण्याची गरज आहे. राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे हे विधानसभेत श्रीवर्धन मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे त्यांनी या बंदराच्या विकासकामात लक्ष घालणे गरजेचे आहे.
मासेमारी हा देशाला परकीय चलन मिळवून देणारा निर्यातक्षम उद्योग आहे. मात्र दुर्दैवाने तो कायम दुर्लक्षित राहिला आहे. रायगड जिल्ह्य़ातील १०८ गावांतील ११ हजार ६३० कुटुंबातील ६९ हजार लोक या व्यवसायाशी निगडित आहेत. ८ हजार मच्छीमारी नौकांतून हा व्यवसाय पावसाळ्यातील चार महिने वगळता नेटाने केला जातो आहे. जिल्ह्य़ातून सरासरी ४० लाख मेट्रिक टन मासेमारी उत्पादन या माध्यमातून घेतले जाते आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात एक तरी मोठे मासेमारी बंदर झाले तर या व्यवसायाला गती मिळू शकणार आहे.