माकडतापाने केर गावातील एकाचा बळी घेतल्यानंतर ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करूनही यश आलेले नाही. कर्नाटकातील एक तज्ज्ञपथक दाखल झाले आहे. दरम्यान मृत माकडे मिळण्याचे प्रमाणही वाढले आहे. अचानकरीत्या माकडे मरण्याचा शोध लावण्याची मागणी होत आहे.
माकडताप सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात प्रथमच दाखल झाला आहे. कर्नाटक व गोवा राज्यात या तापाची साथ येण्याची परंपरा आहे. मात्र केर या दोडामार्ग तालुक्यातील गावात माकडताप नेमका कशामुळे आला, हे अद्यापि समजलेले नाही.
केर गावात सुमारे २० पेक्षाही जास्त रुग्ण तापाने फणफणत होते. त्यानंतर साथीची तपासणी झाल्यावर माकडताप असल्याचे उघड झाले. या तापाने एकाचा बळीदेखील घेतला आहे. या तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गोचीडमुळे या तापाचा संसर्ग होतो म्हणून फवारणीदेखील करण्यात आली आहे.केर गावात एक मृत माकड मिळाले. त्यानंतर दोडामार्ग तालुक्यातील अन्य काही गावात मृत माकडे मिळण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. हे माकड नेमके कशामुळे मृत्युमुखी पडताहेत, तसेच केर गावातील माकडताप साथ नेमकी कशामुळे आली हे अद्यापि उघड झालेले नाही. जंगलातील माकड-वानर बागायतदारांना मोठय़ा प्रमाणात त्रास देत असतात, त्यामुळे माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणी विषारी द्रव्य फवारणी करतात आणि कोणी थेट बंदुकीची गोळी घालून उडवून देत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे माकडे मरण्याचे प्रमाण वाढत आहे.
सिंधुदुर्गात माकडताप यापूर्वी कधी आला नव्हता. माकडे मृत्युमुखी पडणे किंवा त्यांना ठार मारण्याचे प्रकारही पूर्वी घडायचे, पण अचानक ही साथ केर गावात कशामुळे आली हे शोधून काढण्याची मागणी होत आहे.
कर्नाटक राज्यात माकडतापाचा फैलाव झाला होता. त्यामुळे तेथील तज्ज्ञ पथकाला सिंधुदुर्गात पाचारण करण्यात आले आहे. शिमोगा, कर्नाटक येथील वायरस ड्रायग्नॉस्टिक सेंटरचे डॉ. किरण एस. के., श्रीमती संध्या आणि डॉ. वीरभद्रय्या यांचा या पथकात समावेश आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी जंगम आदींनी या पथकाला माकडतापाची माहिती दिली आहे. आता हे पथक माकडताप आटोक्यात आणण्यासाठी योजना कार्यान्वित करणार आहेत. त्याशिवाय ज्या ज्या गावात मृत माकडे मिळाली त्या गावातही दक्षता घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
माकडतापाचा सिंधुदुर्गात प्रसार होऊ नये म्हणून दक्षता घेतानाच माकडे मरण्याच्या वाढलेल्या प्रमाणाची कारणेही शोधण्याची मागणी आहे.