कर्नाटकात भाजपाला मिळालेले यश हे आगामी २०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजपासह, एनडीएला मिळणाऱ्या यशाचे प्रतीक आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. २०१४ मध्ये जनतेने भाजपासह एनडीएला कौल दिला. तसेच भरघोस मतदान २०१९ लाही केले जाईल याची खात्री वाटते असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या मनात आशेची लाट निर्माण केली, या लाटेचे रुपांतर विश्वासाच्या लाटेत झाले आहे त्याचाच हा परिणाम आहे असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी यांचा करीश्मा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे धोरण यामुळेच भाजपाला कर्नाटकात मोठे यश मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट ओसरली असे म्हणणाऱ्या विरोधकांना कर्नाटकच्या जनतेने उत्तर दिले आहे असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

कर्नाटकमध्ये लागणारे निकाल हा जनमताचा कौल आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा विजय आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच बी. एस. येडियुरप्पा यांचे त्यांनी आभारही मानले आहेत. भाजपाने आज कर्नाटक विधानसभेची निवडणुकीचे निकाल हाती यायला लागल्यापासूनच आघाडी घेतली. सध्याच्या घडीला १०० पेक्षा जास्त जागा मिळवत भाजपाने सर्वात मोठा पक्ष म्हणून मजल मारली आहे. अशात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कर्नाटकच्या विजयाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.