कर्नाटक शासनाने बेळगावमध्ये विधानसभेची इमारत बांधून मराठी बांधवांच्या जखमेवर मीठ चोळले असताना अन्यायाची हीच भूमिका कायम ठेवीत ५ डिसेंबरपासून बेळगावात विधिमंडळाचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. या प्रकाराविरुद्ध मराठी बांधवांची पुन्हा एकदा एकजूट होऊ लागली असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे ५ डिसेंबरला कर्नाटक शासनासमोर कडवे आव्हान उभे करण्यासाठी महामेळावा आयोजित केला आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावमध्ये भरणाऱ्या महामेळाव्याचे आयोजन केले असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे. सीमालढय़ाला बळ देणारे ज्येष्ठ नेते एन. डी.   पाटील यांच्यापासून ते पश्चिम महाराष्ट्रातील, कोकणातील मान्यवरांनी महामेळाव्यास उपस्थित राहावे, यासाठी हालचाली सुरू आहेत.
बेळगावसह बिदरी, भालकी महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा यासाठी गेली ५६ वर्षे लढा सुरू आहे. कर्नाटक शासन काही ना काही कारण काढून त्यामध्ये आडकाठी आणत आहे. शिवाय सीमाभागात कन्नड वर्चस्व राहावे, या दिशेने पावले टाकली जात आहेत. त्यातूनच गेल्या महिन्यामध्ये बेळगावमध्ये कर्नाटक शासनाने विधानसभेच्या (सुवर्णसौध) इमारतीचे उद्घाटन केले. त्याकरिता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निमंत्रित केले होते. राष्ट्रपती मुखर्जी यांनी या कार्यक्रमास येऊ नये, असे आवाहनही मराठी बांधवांनी केले होते. या कार्यक्रमाला विरोध दर्शविण्यासाठी सीमा भागात मराठी बांधवांनी बंद पुकारला होता. तणावाच्या वातावरणातच कर्नाटक शासनाला विधानसौध उद्घाटनाचा कार्यक्रम आवरावा लागला होता. आता कर्नाटक शासनाने विधानसौधमध्ये अधिवेशन भरविण्याचा घाट घातला आहे. ५ ते १२ डिसेंबर या कालावधीत अधिवेशन भरविले जाणार आहे. बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य घटक आहे, हे ठसविण्याच्या दृष्टीनेच अधिवेशन भरविले जात आहे. मराठी बांधवांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार कर्नाटक शासनाकडून नव्याने सुरू झाल्याने बेळगाव व परिसरातील मराठी बांधवांतून त्यास तीव्र विरोध होऊ लागला आहे. कन्नडिगांच्या मनसुब्याला विरोध दर्शविण्यासाठी आणि बेळगावातील मराठी वातावरण कायम टिकवून ठेवण्यासाठी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ५ डिसेंबर रोजी बेळगावात महामेळावा घेतला जाणार आहे. यापूर्वी २००६ मध्ये महामेळावा घेण्यात आला होता. पहिल्या महामेळाव्याप्रमाणेच या वेळचा महामेळावाही भव्य प्रमाणात व्हावा आणि त्यातून मराठी बांधवांची एकजूट दिसावी, या उद्देशाने कार्यकर्ते कामाला लागले आहेत. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांकडून तयारीला गती दिली जात आहे.   महामेळाव्याला महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहावे, यासाठी त्यांना निमंत्रण दिले जात आहे. सीमालढय़ाला ताकद देणारे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांची भेट घेऊन मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष वसंतराव पाटील व सहकाऱ्यांनी त्यांना उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर कोल्हापुरातील प्रमुख नेत्यांनाही निमंत्रित केले असून त्यामध्ये कामगारमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार चंद्रदीप नरके आदींचा समावेश आहे.
महामेळाव्याचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष, शहर सरचिटणीस, तालुका, शहर व खानापूर समितीचे अध्यक्ष तसेच दोन माजी आमदारांवर याची जबाबदारी सोपविली आहे. माजी आमदार मनोहर किणेकर, दिगंबर पाटील, राजू मरवे, विनोद दलाल, दीपक नार्वेकर, सुनील पाटील यांचा उपक्रमामध्ये पुढाकार आहे.