राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कर्नाटकात पुतळा जाळल्यानंतर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून युवासैनिकांनी कोल्हापूरमध्ये थिएटरमध्ये घुसून कन्नड चित्रपटाचा शो बंद पाडलाय. याशिवाय युवासैनिकांनी चित्रपटगृहावरील कन्नड पोस्टरही उतरवले आहेत. सीमावादातून दोन्ही राज्यांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. खबरदारी म्हणून दोन्ही राज्यांतील एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर जावून गोळ्या घाला असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर बेळगावमधील मराठी भाषिक आणि शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. युवासैनिकांनी कोल्हापूरच्या अप्सरा थिएटरमध्ये सुरू असलेला ‘अवणे श्रीमनारायन’ हा चित्रपट थिएटरमध्ये घुसून बंद पाडलाय. याशिवाय चित्रपटगृहावरील कन्नड पोस्टरही फाडले.
पाहा व्हिडीओ:

यापूर्वी शिवसैनिकांनी भीमाशंकर यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढल्यानंतर संतप्त झालेल्या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बेळगावातील दुकानांवर असलेले मराठी फलक तोडून टाकले. शिवसैनिकांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शनिवारी आंदोलन केल्याची बातमी समजताच येथील कन्नड संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. बेळगावात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळल्यानंतर त्याचे पडसाद राज्यातही उमटू लागले आहेत. वातावरण तापू लागल्याने दोन्ही राज्यातील परिवहन महामंडळाने दक्षतेचा उपाय म्हणून एसटी सेवा बंद केली आहे. अशातच, आज बेळगाव येथे चंदगडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राजेश पाटील यांचा महाराष्ट्र एकीकरण युवा समिती मार्फत आणि समस्त बेळगावकर सीमावासियांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. अनगोळ येथे आदर्श मल्टिपर्पज सोसायटी सभागृहात दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेला कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा कन्नड वेदिका संघटनेने दिला आहे.