सीमेपर्यंतच बसवाहतूक

सांगली : करोना चाचणी प्रमाणपत्र सक्तीवरून दोन दिवसांपासून कर्नाटक-महाराष्ट्र बस सेवा खंडित झाली असून दोन्ही राज्यांची बसवाहतूक सीमेपर्यंतच सुरू आहे. कर्नाटकात चाचणी प्रमाणपत्राची सक्ती आणि महाराष्ट्रात प्रवेश करण्यास मोकळीक यामुळे काही प्रवाशांनी कर्नाटक परिवहन विभागाच्या बसेस मिरज स्थानकावर रोखल्याने बस वाहतूकच कर्नाटकने थांबवली आहे.

करोना प्रसारात सांगली, कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे आघाडीवर असल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशाकडे करोना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. या उलट कर्नाटकातून सांगली, मिरजेत येणाऱ्या प्रवाशांची तपासणीही केली जात नसताना ही सक्ती कशासाठी, असा सवाल करीत दोन दिवसांपूर्वी मिरज बस स्थानकावर कर्नाटक राज्य परिवहन विभागाच्या बसेस रोखण्यात आल्या होत्या. यामुळे कर्नाटकने आपल्या बसेस केवळ म्हैसाळ सीमेपर्यंतच सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर महाराष्ट्र परिवहन विभागाच्या बसेसही केवळ सीमेपर्यंतच धावत आहेत.

बस सेवा खंडित झाल्याने प्रमाणपत्र असलेल्या प्रवाशांचीही गैरसोय होत असून  कागवाड, अथणीसह सीमाभागातील अन्य गावी जाणाऱ्या प्रवाशांना सीमेपर्यंत जाण्यासाठी खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे.

शिवसेनेचे आंदोलन

कोल्हापूर : कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी सक्ती करण्याच्या कर्नाटक शासनाच्या निर्णयाविरोधात कोल्हापूर जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेसने याविरोधात आंदोलन केल्यानंतर आज शिवसेनेने याच मागणीसाठी निदर्शने केली.

पुणे—बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागल येथे महाराष्ट्राचा शेवटचा टोल नाका आहे. तेथून पुढे काही अंतरावर कर्नाटकातील कोगनोळी या गावात कर्नाटकातील टोल नाका सुरू होतो. कर्नाटकात करोना संसर्ग वाढू नये याची दक्षता म्हणून तेथील राज्य शासनाने राज्यात प्रवेश करणा?ऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी सक्तीची केली आहे. मात्र ही सक्ती कोल्हापूर जिल्हा अंतर्गत प्रवास करणाऱ्यांना अडचणीची ठरत आहे. निपाणीच्या पुढे असणाऱ्या स्तवनिधी (तवंदी) येथे उजव्या बाजूला एक फाटा आहे. तेथून कागल, आजरा, राधानगरी, चंदगड, गडहिंग्लज या भागात प्रवास करता येतो. या प्रवाशांना कोगनोळी नाका येथे चाचणीची सक्ती केली जात असल्याने पुढचा प्रवास करता येत नाही. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केल्यानंतर गुरुवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कोगनोळी टोल नाक्यावर निदर्शने करण्यात आली. शिवसैनिकांनी स्तवनिधी येथपर्यंत प्रवास करण्यास मुभा द्यावी. तेथे कर्नाटकात प्रवेश देण्यासाठी स्वतंत्र टोलनाका उभा करावा, अशी मागणी कर्नाटक पोलिस अधिकाऱ्यांकडे केली.