काँग्रेसने कर्नाटकात भाजपाचा पराभव केला हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे विधान हास्यास्पद आहे. जनता दल सेक्युलर आणि काँग्रेसमध्ये सत्तेसाठी झालेली आघाडी हे एकप्रकारचे आत्मसमर्पण आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी होऊ नये यासाठी काँग्रेसने जेडीएसशी हातमिळवणी केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री आणि कर्नाटकचे भाजपा प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी केला.

राहुल गांधी यांनी स्वत: जेडीएस प्रमुख देवेगौडा यांच्याबद्दल मानहानिकारक विधाने केली होती ही एक संधीसाधू आघाडी आहे असे जावडेकर म्हणाले. येडियुरप्पा यांनी आज लोकशाहीचा आदर कसा केला जातो हे दाखवून दिले. राजीनाम्याआधी त्यांनी जनतेच्या मनाला स्पर्श करणारे भाषण केले असे जावडेकर म्हणाले.

आम्ही घटनात्मक संस्थांचा आदर करत नाही, आवाज दाबतो असे काँग्रेसचा आरोप आहे. मग संसदेचे कामकाज कोणी बंद पाडले ? संसदेचा भंग काँग्रेसने केला. राहुल गांधींमुळे संसदेचे कामकाज होऊ शकले नाही. काँग्रेस साधा सैन्याचा आदर करत नाही. काँग्रेसने देशाच्या लष्करप्रमुखांना गुंड म्हणून त्यांचा अपमान केला असे आरोप प्रकाश जावडेकर यांनी केला.

आज तुम्ही मुक्तपणे पत्रकारिता करु शकता. मीडियाचा आवाज काँग्रेसच्या राजवटीत दाबला जात होता असे जावडेकर म्हणाले. काँग्रेसला देशाच्या मुख्य न्यायमूर्तींविरोधात महाभियोग चालवायचा होता. पण सर्वोच्च न्यायालयाने, राज्यपालांनी त्यांच्या बाजूने निर्णय दिला कि, ते चांगले ठरतात अन्यवेळी काँग्रेसकडून त्यांच्यावर टीका केली जाते असे जावडेकर म्हणाले.