विठुरायाच्या गजरात आणि हरिनामाच्या भक्तीरसात चिंब झालेल्या हजारो वैष्णवांच्या साक्षीत आज पंढरीत कार्तिकी एकादशीचा सोहळा साजरा झाला. आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार पूजेस गैरहजर राहिल्याने जिल्हय़ाचे पालकमंत्री व पाणीपुरवठा, स्वच्छतामंत्री दिलीप सोपल यांच्याहस्ते आजची शासकीय महापूजा पार पडली.
या वेळी त्यांनी ‘राज्यातील जनतेला सुखी- समाधानी ठेव, भरपूर पाऊस पडू दे, धनधान्य भरपूर होऊ दे, भूकंपासारख्या आपत्तीपासून संरक्षण कर,’ अशी  प्रार्थना आपण एकादशीची महापूजा झाल्यावर विठ्ठलाकडे केली, असे जिल्हय़ाचे पालकमंत्री व पाणीपुरवठा, स्वच्छतामंत्री दिलीप सोपल यांनी सांगितले. या वेळी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार दीपक साळुंखे पाटील, आमदार राणा जगजितसिंह, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण  गेडाम, महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्तिकी एकादशीच्या या सोहळय़ासाठी गेल्या दोन दिवसांतच तीन लाखांहून अधिक वैष्णवजण पंढरीत दाखल झाले आहेत. आज सकाळीपर्यंत या मेळय़ात मोठी वाढ झाली. विठुरायाचा गजराने सारे शहर भक्तिरसात चिंब भिजून गेले. चंद्रभागेचे वाळवंट भक्तांनी गजबजले होते. सर्वत्र धार्मिक कार्यक्रम चालू होते.
सकाळीच या वारकऱ्यांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांग लावली. ही दर्शन रांग काही किलोमीटपर्यंत लांब गेली होती. शासकीय महापूजेचा मान या दर्शनरांगेतीलच तुकाराम हरि पाटील (वय ६४) व जयश्री तुकाराम पाटील (वय ५५, रा. एरंडोली, ता.मिरज, जि.सांगली) या वारकऱ्यांना मिळाला. त्यांच्या निवडीबद्दल त्यांना समितीच्या वतीने वर्षभराचा एस.टी.चा प्रवास पास समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी आमदार सुरेश  खाडे, उल्हास पवार, जि.प. अध्यक्षा निशिगंधा माळी, विशेष पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण, समिती सदस्य बाळासाहेब बडवे, वसंत पाटील, प्रा. जयंत भंडारे, जिल्हा पोलीसप्रमुख राजेश प्रधान, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कदम, तहसीलदार डोगरे आदी उपस्थित होते.
दुपारनंतर वारकरी, खरेदीदार यांनी घोडेबाजार जनावरांचा बाजार येथे गर्दी केली. दुपारी चांदीच्या रथात श्रीविठ्ठलाची चांदीची प्रतिमा ठेवून नगरप्रदक्षिणा सोहळा पार पडला. या वेळी भक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली तसेच रथावर खारीक बुक्का याची उधळण केली.
अजित पवारांची संधी
दुसऱ्यांदा हुकली  
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्तिकी यात्रेवेळी विठ्ठलाच्या महापूजेची संधी दुसऱ्यांदा हुकली आहे. यावर्षी भीषण दुष्काळी परिस्थितीत त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदा अजित पवारांच्या हस्ते विठ्ठलाच्या पूजेस विरोध केला होता. या पाश्र्वभूमीवर त्यांनी दौरा रद्द करत येण्याचे टाळले. गेल्यावर्षीही त्यांच्या हस्ते पूजा होणार होती, पण तत्पूर्वीच त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने त्या वेळीही त्यांच्याऐवजी लक्ष्मण ढोबळे यांनी महापूजा केली होती.