सर्जिकल स्ट्राईकचे जनक लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचे मत

काश्मिरात दहशतवाद्यांना संधी मिळत आहे, तेव्हा यामागील कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे. यात नेमकी चूक कुणाची झाली, याचा शोध घेतानाच दहशतवाद्यांना एक तर आपल्या बाजूने करावे लागेल किंवा बंदुकीचे उत्तर बंदुकीने द्यावे लागेल, असे मत सर्जिकल स्ट्राईकचे जनक लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केले.

सैनिक शाळेच्या पाहणीसाठी चंद्रपुरात आले असता काश्मीर हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर पत्रकारांशी बोलत होते. काश्मीरसारख्या प्रदेशात एखादा हल्ला करायचे म्हटले तर दहशतवाद्यांनाही बराच अभ्यास व नियोजन करावे लागते. अशाही स्थितीत दहशतवाद्यांना हल्ला करण्याची एक संधी मिळत आहे. तेव्हा यामागे नेमके काहीतरी आहे, त्याचा शोध घ्यावा लागेल, नेमकी कुणाची चूक झाली आहे, याचा अभ्यास करून भविष्यात अशाप्रकारच्या घटना होणार नाही यासाठी विशेष काळजी घ्यावी लागेल, असेही निंभोरकर म्हणाले.

मागील काही दिवसात अनेक दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळाले असले तरी अजूनही दहशतवादी तिथे आहेत. पुलवामा हल्ल्यातील आत्मघातकी अतिरेकी आदिल हा काश्मीरमधील एका छोटय़ा गावातील रहिवासी आहे. या गावात मोठय़ा संख्येने दहशतवादी आहेत. एकप्रकारे हे नटोरियस गाव आहे. तेव्हा गुप्तचर यंत्रणांनी अशा गावावर लक्ष्य केंद्रित करणे आवश्यक आहे. हा हल्ला नेमका कसा झाला, त्यामागील कारणांचाही शोध घेणे आवश्यक आहे. काश्मिरात सक्रिय अशा दहशतवाद्यांविरुद्ध अ‍ॅक्शन घेणे आवश्यक झाले आहे, असेही निंभोरकर म्हणाले.