08 March 2021

News Flash

यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण, ‘वंदे मातरम’ म्हणण्याची सक्ती

तुम्ही लोक इथे शिक्षणासाठी येतात आणि तिथे आमच्या जवानांना मारता, असे सांगत कार्यकर्ते त्या विद्यार्थ्यांना मारहाण केली.

काश्मिरी विद्यार्थ्यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. वाघापूर परिसरातील वैभव नगर येथे बुधवारी रात्री युवा सेनेच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुलवामा येथे गेल्या आठवड्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यात 41 जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर देशातील विविध भागांमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याचे लोण आता यवतमाळमध्ये पोहोचले आहे. 15 ते 20 काश्मिरी विद्यार्थी यवतमाळमध्ये शिक्षण घेत असून यातील 3 ते 4 विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे.

युवा सेना कार्यकर्त्यांनी मारहाणी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडिओत युवा सेनेचे कार्यकर्ते त्या तरुणांना नाव आणि काश्मीरमधून कुठून आला आहात, असे विचारताना दिसतात. तुम्ही लोक इथे शिक्षणासाठी येतात आणि तिथे आमच्या जवानांना मारता, असे सांगत कार्यकर्ते त्या विद्यार्थ्यांना मारहाण करताना व्हिडिओत दिसते. यापुढे तुम्ही इथे यायचे नाही, अशी धमकीही युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणांना दिली. आम्ही इथे शिक्षणासाठी आलो, आम्ही चांगल्या कुटुंबातून आलो आहोत, असे त्या काश्मिरी तरुणांनी कार्यकर्त्यांना सांगितले. यानंतर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काश्मिरी तरुणांना ‘वंदे मातरम’ बोलायला लावले.

लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोनोले यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीरमधील काही तरुण यवतमाळमधील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. बुधवारी संध्याकाळी सात ते आठ लोकांनी त्यांना अडवले आणि शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्यांना वंदे मातरम बोलण्यास भाग पाडले. यातील आरोपींबाबत अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र, ओळख पटल्यानंतर त्यांना अटक केली जाईल, असे पोलीस निरीक्षकांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 2:52 pm

Web Title: kashmir youth beaten by yuva sena party workers in yavatmal video viral
Next Stories
1 Pulwama Terror attack: बुलढाण्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना पाच एकर जमीन
2 जळगावात ट्रॅक्टरने दोन शाळकरी मुलांना चिरडले
3 अहमदनगरमधील टुरिझम फोरमचा काश्मीरमधील पर्यटनावर बहिष्कार
Just Now!
X