देशभरात पसरलेल्या करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउनचा टप्पा १७ मे पर्यंत वाढवलेला आहे. राज्यातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत अनेक करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येवर आळा घालण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने यावर नवीन तोडगा काढला होता. महापालिका क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या व कामानिमीत्त मुंबईत ये-जा करणाऱ्या शासकीय, खासगी कर्मचाऱ्यांना मुंबईला जाण्यास मनाई करण्यात आली होती. परंतु बुधवारी पालिकेनं पत्रक काढून या निर्णयाला तुर्तास स्थगिती दिली आहे.

कल्याण-डोंबिवली महागरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या तसंच मुंबईत विविध ठिकाणी कामासाठी जाणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्यांची राहण्याची व्यवस्था मुंबईतच करण्याची विनंती पालिकेनं केली होती. परंतु मुंबईत वास्तव्य करण्यासाठी आणि व्यवस्था करण्यासाठी आस्थापनांना वेळ लागत आहे. त्यामुळे पालिका क्षेत्रात या कर्मचाऱ्यांना प्रतिबंधीत करण्याचा निर्णय स्थगित करण्यात येत असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. तसंच मुंबई महानगरपालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेला सादर करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. ही माहिती पालिकेकडून मुंबई महानगरपालिकेला सादर करण्यात येणार असल्याचंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.


काय होता निर्णय?

महापालिका क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या व कामानिमीत्त मुंबईत ये-जा करणाऱ्या शासकीय, खासगी कर्मचाऱ्यांना मुंबईला जाण्यास मनाई करण्यात आली होती. ८ मे पासून या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबईत कामानिमित्त जाणाऱ्या व डोंबिवलीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या अनेक व्यक्तींना गेल्या काही दिवसांमध्ये करोनाची बाधा झाल्याचं दिसून होतं. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी हा निर्णय घेतला होता.

मुंबईत अत्यावश्यक सेवेत कामाला असणाऱ्या अनेक व्यक्तींचा गेल्या काही दिवसांमध्ये सतत प्रवास सुरु आहे. या सर्व कर्मचाऱ्यांनी राहण्याची व्यवस्था स्वतंत्र केली जावी अशी मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने हा तोडगा काढला होता. मुंबईत कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपली संपूर्ण माहिती ई-मेलद्वारे महापालिकेला पाठवण्यात यावी असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.