विधानसभा निवडणुकीत विदर्भविरोधी पक्षांना वैदर्भीय जनतेने नाकारले असल्याने शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवावे, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक व प्रवक्ते राम नेवले यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत विदर्भातून ६२ पैकी ४४ जागा भाजपला देऊन वैदर्भीय जनतेने भाजपच्या सोबत खंबीरपणे उभे राहून महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी वैदर्भीय जनतेने मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यास वेगळा विदर्भ देईल, या आशेने विदर्भात भाजपला भरघोस यश आले. तर दुसरीकडे शिवसेनेला अध्र्यावरच आणले. राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारले तर काँग्रेस पक्षाचीही मोठी पीछेहाट झाली. विदर्भविरोधी पक्षांना वैदर्भीय जनतेने मोठय़ा प्रमाणावर नाकारले तर विदर्भाचे समर्थन करणाऱ्या भाजपला मोठय़ा प्रमाणावर यश दिले. आता भाजपवर वेगळ्या विदर्भाची मोठी जबाबदारी आली आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्याचा कट्टर विरोध करणारी शिवसेना विदर्भातून जवळपास हद्दपार झाली आहे. परंतु सरकार स्थापनेसाठी शिवसेनेने अखंड महाराष्ट्राची घातलेली अट ही विदर्भासाठी पुन्हा अडचण ठरू शकते. म्हणून विदर्भ विरोधी शिवसेनेशी सरकार स्थापनेसाठी युती करू नये, असे वैदर्भीय जनतेला वाटते. भाजपसोबत मैत्री करून शिवसेना पुन्हा सत्तेमध्ये शिरण्याचा प्रयत्न करेल व विदर्भ विरोधाचा दबाव सुद्धा कायम ठेवेल, म्हणून या दोन्ही बाबींपासून भाजपने बचावून राहणे गरजेचे असल्याकडेही नेवले यांनी लक्ष वेधले आहे.
विदर्भाच्या जनतेने विदर्भासाठी टाकलेल्या मोठय़ा विश्वासाचा भाजपने सन्मान केला पाहिजे. राज्यातील नवे सरकार विदर्भ राज्याची घोषणा करेल, अशी अपेक्षा विदर्भ राज्य आंदोलन समितीला आहे, असेही नेवले यांनी म्हटले आहे.