साताऱ्यातील एका रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे खासदार उदयन राजे भोसले यांना डोके शांत ठेवा असा सल्ला दिला. रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात डॉक्टरांनी सांगितले डोके शांत ठेवा. ज्यानंतर पवार भाषणासाठी उभे राहिले तेव्हा त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, उदयनराजे डॉक्टरांचा सल्ला आपल्या दोघांना आहे. आपण तो स्वीकारू डोके शांत ठेवू असे म्हटले. डॉक्टरांनी ते हे आपल्यासाठीच सांगितले का? हे मला माहित नाही मात्र आपण दोघेही हा सल्ला ऐकू असे पवारांनी म्हटले आहे.

हॉस्पिटलच्या कार्यक्रमासाठी गेल्यावर मला अनेक गोष्टींची आठवण होते. मल्टिपरपज हॉस्पिटलसाठी पेशंटही मल्टिपरपज हवा आहे. तो पेशंट म्हणजे मी स्वतः आहे. कारण मी कॅन्सरला तोंड दिले, डॉक्टरांनी माझे सगळे दात घश्यात घातले. त्यानंतर डॉक्टरांनी मला तुम्हाला स्टेंन बसविण्याची गरज आहे असे सांगितले, मी त्यांना काय बसवायचे ते बसवा असे सांगितले. मी पाय घसरून पडलो त्यावेळी पायात रॉड टाकला. ते पण मी सहन केले. मध्यंतरी हृदयाकडे अशुद्ध रक्त घेऊन येणाऱ्या व्हेनमध्ये अडथळे आले. त्यामुळे त्याचेही उपचार मी घेत आहे. या सर्वाचा मला अनुभव असल्याने मी मल्टिपरपज आहे. मला मनापासून आनंद होतोय साताऱ्यात असे हॉस्पिटल उभारले आहे, कारण हे आपलेच घर आहे असे मला वाटते. माझा प्रवास सातारा जिल्ह्यात जास्त वेळा असतो. त्यामुळे एक चांगले हॉस्पिटल सुरु झाले याचा मनस्वी आनंद होत असल्याचेही मत शरद पवारांनी व्यक्त केले. असे असले तरीही साताऱ्यात चर्चा रंगली ती शरद पवारांनी उदयनराजेंना दिलेल्या डोके शांत ठेवा या सल्ल्याचीच!