कल्याणमधील दोन वर्षांच्या चिमुरडीचा केरळमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. हाऊसबोटमध्ये खेळत असताना पाण्यात पडल्याने चिमुरडीचा अंत झाला असून भटकंतीसाठी केरळमध्ये गेलेल्या शेट्टी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

कल्याण पश्चिमेत राहणारे शिवप्रसाद शेट्टी त्यांच्या कुटुंबीयांसह केरळमध्ये फिरायला गेले होते. शेट्टी हे आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. शेट्टी, त्यांची पत्नी सौम्या शेट्टी (वय ३४), त्यांचा सात वर्षांचा मुलगा ब्रहिथ आणि दोन वर्षांची अन्विता असे चौघे जण केरळमध्ये गेले होते. मंगळवारी अलप्पुझा जिल्ह्यातील पल्लथुरुथी येथील हाऊसबोटमध्ये शेट्टी दाम्पत्य उतरले होते. नियमानुसार हाऊसबोट संध्याकाळी बॅकवॉटरमध्ये नेता येत नाही. त्यामुळे हाऊसबोट मुंदकल पुलाजवळ थांबली होती.

शिवप्रसाद शेट्टी मुलगी अन्विता आणि मुलगा ब्रहिथसोबत हाऊसबोटच्या समोरील भागात खेळत होते. यादरम्यान अन्विता शिवप्रसाद यांच्या हातातून निसटली आणि थेट पाण्यात पडली. मुलीला वाचवण्यासाठी शिवप्रसाद यांनी देखील नदीत उडी मारली. मात्र, त्यांना देखील पोहता येत नव्हते. शिवप्रसाद यांनी टायरला पकडून ठेवल्याने ते बचावले. शेवटी स्थानिकांनी पाण्यात उडी मारली आणि शिवप्रसाद यांना बाहेर काढले. काही वेळात अन्विताला देखील बाहेर काढण्यात आले. तिला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. हे वृत्त समजताच स्थानिक नागरिकांनी शेट्टी यांच्या मदतीसाठी धाव घेतली. शेट्टी दाम्पत्याला हाऊसबोटमधून एका हॉटेलमध्ये नेण्यात आले. तिथे शेट्टी दाम्पत्याच्या सांत्वनासाठी स्थानिक जमले होते.

बुधवारी सकाळपर्यंत शवविच्छेदन पूर्ण होईल. त्यानंतर अन्विताचा मृतदेह कुटुंबीयांकडे दिला जाईल. त्यांना मुलीचा मृतदेह कल्याणला घेऊन जायचं असेल तर त्यांना त्यानुसार मदत केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.