गौरी-गणपती सणाच्या पाश्र्वभूमीवर दारिद्रय़ रेषेखालील कार्डधारकांना रेशिनग धान्य वाटप करण्यात आले, पण रॉकेलचा पत्ताच नाही. रेशनिंग दुकानावर रॉकेल उपलब्ध नसल्याने गॅस कनेक्शन नसणाऱ्या भक्तांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामीण भागात गरीब, सामान्य गणेशभक्तांना रॉकेलची गरज भासते. जेवण करण्यासाठी स्टोह, लाईट गेल्यावर दिवे किंवा गॅसबत्ती अशा कारणासाठी रॉकेलची गरज भासते.
गरीबांना रेशनिंग धान्य उपलब्ध करून देणाऱ्या सरकारने रॉकेल उपलब्धच करून दिले नसल्याने गणेशभक्तांनी जेवण बनविण्यासाठी स्टोहमध्ये रॉकेल कुठून घालायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार शशिकांत जाधव यांना विचारले असता रॉकेल पुरवठा करणाऱ्या एजन्सीने शनिवारी परमिट घेतले असून मंगळवापर्यंत रॉकेल पुरवठा रेशनिंग दुकानावर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
श्रीगणेश चतुर्थीच्या पाश्र्वभूमीवर रेशनिंग धान्यपुरवठा करताना ग्राहकांसाठी रॉकेल पुरवठा करण्यात यायला हवा होता, पण पुरवठा विभागाने ग्राहकांचे म्हणजेच गणेशभक्तांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे.
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पुरवठा विभागाच्या या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. शहर-ग्रामीण भागातील ग्राहकांनी मात्र नाराजी व्यक्त केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 5, 2016 1:05 am