News Flash

वारक-यांसाठीचे रॉकेल मंजुरीच्या प्रतीक्षेत

राज्याच्या सर्व भागातून आषाढी एकादशीकरिता येणा-या लाखो वारकरी, भक्तांच्या स्वयंपाकासाठी रॉकेलच मंजूर केले नाही, मासिक कोठय़ात कपात करून वारक-यांना रॉकेलची सोय करून शिधापत्रिकाधारकांना रॉकेलपासून वंचित

| July 10, 2013 12:09 pm

राज्याच्या सर्व भागातून आषाढी एकादशीकरिता येणा-या लाखो वारकरी, भक्तांच्या स्वयंपाकासाठी रॉकेलच मंजूर केले नाही, त्यामुळे दरमहा देण्यात येणाऱ्या मासिक कोठय़ात कपात करून वारक-यांना रॉकेलची सोय करून शिधापत्रिकाधारकांना रॉकेलपासून वंचित ठेवले जाणार आहे.
आषाढी एकादशीकरिता राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असून ते किमान १० ते १५ दिवस मुक्कामी असतात, त्यामुळे प्रशासन त्यांना सुविधा पुरवते. त्याचप्रमाणे राज्यातील किमान १० ते १५ जिल्हय़ांतून एक केरोसिन टँकर मासिक कोटय़ातून कमी करून वारकऱ्यांची सोय करावी.
यात्राकाळात धर्मपुरी ते पंढरपूर व पालखी मार्गावरील मुक्कामी असणाऱ्या वारकऱ्यांसाठी स्वयंपाकाला रॉकेल पुरवठा करता यावा याकरिता शासनाकडे २१ टँकर केरोसिनची मागणी केली होती, परंतु ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे प्रशासनाने दरमहा शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणाऱ्या मासिक कोटय़ात कपात करून वारकऱ्यांची सोय केली आहे.
जिल्हय़ातून प्रत्येक तालुक्यातून एक केरोसिन टँकर कपात करून वारीकरिता केरोसिन उपलब्ध केले जाणार आहे. शासनाने वारकऱ्यांची सोय करताना मात्र शिधापत्रिकाधारकावर अन्याय केला आहे. मुळात तीन महिने झाले, जिल्हय़ातील शिधापत्रिकाधारकांना दरमहा ३४ टक्केप्रमाणे माणशी ७०० ते ८०० मि.मि.प्रमाणे पाच माणसाला २ ते २.५० लीटर रॉकेल मिळते. शासन नुसती घोषणा करते, परंतु गेली तीन वर्षे रॉकेलचा पुरवठाच करत नाही. वारी आली की जिल्हा प्रशासन जिल्हय़ातून टँकर कपात करून रॉकेलची वारीत सोय करते.
शासनाने महाराष्ट्रातील जिल्हय़ातून एक एक टँकर कपात करून आषाढी व कार्तिकी वारीकरिता सोय करावी, यात जिल्हय़ाचे पालकमंत्री, आमदार, खासदार, नेतेमंडळी अन् पांडुरंगाचे भक्त असलेल्या नेत्यांनी पाठपुरावा करून ही सोय उपलब्ध करावी. याबाबतचे लेखी निवेदन मुख्यमंत्री महापूजेला येणार त्या वेळी हॉकर्स संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहे.
पंढरीत आषाढी किमान १० ते ११ लाखांवर भरेल असा प्रशासनाचा अंदाज आहे. यातील किमान दोन ते तीन लाख वारकरी भक्त स्वयंपाकासाठी वापर करतात असे गृहीत धरले तरी संपूर्ण वारीकरिता म्हणजे १० ते ११ दिवसांच्या मुक्कामात तीन ते चार लाख लीटरची गरज आहे.
यात्रा काळात शहराच्या विविध भागांतील ५० ठिकाणी रॉकेल विक्रीची हॉकर्समार्फत सोय केली जाते. प्रत्येक हॉकर्सला सकाळी ८ ते रॉकेल संपेपर्यंत २०० लीटर रॉकेल देण्यात येते. सकाळी ८ ते किमान १२ वाजेपर्यंत ५० ठिकाणी प्रत्येक वारकऱ्यास दोन लीटरप्रमाणे ५ हजार वारकऱ्यांना रॉकेल मिळते. एक लीटरप्रमाणे वाटप केले तर वरील काळात १० हजार वारकरी भक्त यांना रॉकेल मिळते.
वारकरी मुक्कामी ८ ते १० लाख केरोसिन वापरणारे २ ते ३ लाख अन् वारीकरिता ६० ते ७० हजार लीटर हे १० ते ११ दिवसांच्या मुक्कामी वारकऱ्यांना मिळते. यात्राकाळात किमान तीन ते साडेतीन लाख लीटर गरज आहे.
याकरिता सर्व नेते, आमदार, खासदार अन् जिल्हय़ाच्या पालकमंत्र्यांनी लक्ष घालून आषाढी व कार्तिकी यात्रेकरिता वाढीव कोटा किंवा प्रत्येक जिल्हय़ातील एक टँकर याप्रमाणे वारीकरिता मंजूर करून घ्यावा.
वारीकरिता सोलापूर जिल्हय़ातून वारीकरिता मासिक कोटय़ातून रॉकेल कपात केल्याने दरमहा शिधापत्रिकाधारकांना जुलै महिन्यात रॉकेल पुरेशा प्रमाणात मिळेल की नाही याची शाश्वती नाही. वारकऱ्यांची सोय करताना शिधापत्रिकाधारकांना दरमहा मिळणाऱ्या रॉकेलला वंचित राहावे लागणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. याकरिता शासनानेच वारीकरिता प्रत्येक जिल्हय़ाला देण्यात येणाऱ्या मासिक कोटय़ातून एक केरोसिन टँकर द्यावा अशी सर्वाची अपेक्षा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2013 12:09 pm

Web Title: kerosene waiting for sanctioning for pilgrims
टॅग : Pilgrims,Waiting
Next Stories
1 आषाढीनिमित्त पंढरपुरात जादा बंदोबस्त
2 महाराष्ट्र, कर्नाटक व छत्तीसगढ मध्ये एकाच दिवशी १०८ कविसंमेलने
3 सुरेश जैन यांचा जामीन पुन्हा नामंजूर
Just Now!
X