राज्याचे उद्येगमंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडीतून विधानसभेची निवडणूक लढवावी आपण त्यांच्या विरोधात अपक्ष लढू असे आव्हान राष्ट्रवादीचे निलंबित आमदार दीपक केसरकर यांनी शुक्रवारी शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना दिले.
आमदार केसरकर शिवसेनेत जाण्याची चर्चा असतानाच त्यांनी मात्र राणेविरोधात अपक्ष लढण्याचे संकेत दिले. ते म्हणाले, सावंतवाडीत आपले डिपॉझिट जप्त करण्याचे आव्हान राणे यांनी दिले आहे. त्यांनी ही जागा राष्ट्रवादीकडून काँग्रेसला घ्यावी व लढवावी, आपण यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवू. आपला लढा राणे यांच्या नव्हे तर विशिष्ठ प्रवृत्तीच्या विरोधात असल्याने आपल्याला सर्वच पक्ष मदत करतील. विधानसभेला मतदार व्यक्ती व काम पाहून मतदान करतात, त्यामुळे अपक्षही मोठय़ा संख्येने निवडणून येतात. शिवसेनेत येण्यविषयी आपल्यावर कोणताही दबाव नाही. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी केवळ आपले अभिनंदनापुरते बोलणे झाले. मात्र ठाकरेंनी कोणत्याही निर्णयात आपल्या बरोबर राहण्याचे आश्वसन दिले. राजकारणात यासाठी मोठे मन लागते, असेही केसरकर यांनी सांगितले.
गोव्यापेक्षाही कोकणात पर्यटन वाढीला मोठी संधी आहे. संधी मिळाली तर कोकणवासीयांना विश्वासात घेऊन गोव्याच्या धर्तीवर पर्यटन विकासासाठी आपला प्रयत्न राहील. उद्योगमंत्री असलेल्या राणेंच्या जिल्ह्य़ातील कुडाळ एमआयडीसीतील ८० टक्के उद्योग बंद आहेत. त्यांनी कधी कोकणात उद्योगधंदे व रोजगारवाढीसाठी प्रयत्न केले नाहीत, आम्हालाही आमदारकीच्या माध्यमातून काही करु दिले नाही, असा आरोपही केसरकर यांनी केला. आपला आमदारकीचा राजीनामा मंजूर होईपर्यंत आपण राष्ट्रवादीतच आहोत असेही ते म्हणाले.