खडसे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असूनही पक्ष त्यांच्यावर अन्याय करत आहे. पक्षाकरता राबूनही आमची कामे होत नाहीत. नाथाभाऊंच्या मंत्रिमंडळात घेण्याबाबत आम्ही किती दिवस वाट बघायची, याबाबत जनता आम्हाला विचारणा करते, अशा प्रश्नांची सरबत्ती रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांच्यासमोर केली. लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर, दानवे हे सध्या राज्यातील ४८ मतदारसंघांचा दौरा करत आहेत. त्याअंतर्गत ते शनिवारी रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. सकाळी रावेर मतदारसंघाचा दौरा भुसावळ येथे झाला. या वेळी कार्यकर्त्यांनी खडसेंच्या पुनर्वसनाबाबत आक्रमक भूमिका घेत दानवेंना जाब विचारला.

रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी, खडसे समर्थकांनी प्रदेशाध्यक्ष दानवे यांना नाथाभाऊंना न्याय केव्हा मिळणार, त्यांना मंत्रिमंडळात कधी स्थान मिळणार, असे प्रश्न विचारत प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत खडसे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. या वेळी आ. खडसे यांनी गत ४० वर्षांच्या कारकीर्दीत कोणतेही आरोप आपल्यावर झाले नसल्याचे सांगितले. परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून आरोप झाले आणि त्यामुळे आपल्यावर अन्याय करण्यात आला. नाथाभाऊ दोषी आहेत की, निर्दोष एवढेच महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्यावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावर खुलासा करत खडसे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून आगामी काळात मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास त्यांना नक्कीच स्थान दिले जाईल असे सांगून दानवे यांनी वेळ मारून नेली.

शिवसेनेबाबत विचारले असता, मतांचे विभाजन टाळण्यासाठी सेनेसह समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे, पक्ष म्हणून सेनेची भूमिका वेगळी असल्याने तसेच त्यांचा पक्ष वाढण्यासाठी ते भाजपवर टीका करतात. मात्र सरकार म्हणून त्यांच्यासोबत आमचे मतभेद नाहीत, असा दावा त्यांनी केला. राममंदिराबाबत उद्धव ठाकरे अयोध्येला जात असल्याचे त्यांनी स्वागत केले.