कुख्यात गुंड दाऊद सोबतच्या कथित फोनकॉल प्रकरणी अडचणीत आलेल्या माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंना आता महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) क्लीन चीट देण्यात आली आहे. खडसे आणि दाऊद यांच्यात कोणतेही संभाषण झाले नव्हते, अशी माहिती महाराष्ट्र एटीएसने मुंबई उच्च न्यायालयाला दिली. तसेच या कथित फोन कॉल प्रकरणाचा अहवाल सायबर सेलकडे सोपवणार असल्याचे देखील सांगितले. महाराष्ट्र एटीएसच्या या क्लीनचीटमुळे खडसेंना तूर्त दिलासा मिळाला आहे.
दाऊद सोबतच्या कथित संभाषणामुळे खडसे वादाच्या भोव-यात सापडले होते. खडसेंच्या राजीनाम्यासाठी कथित फोन कॉलचे प्रकरण देखील कारणीभूत होते. दाऊदच्या कराची इथल्या घरातून खडसेंना संपर्क साधण्यात आला असल्याचा आरोप वडोदऱ्याचा हॅकर मनीष भंगाळे याने आरोप केला होता. या हॅकरने पाकिस्तानी दूरध्वनी कंपन्यांची संकेतस्थळे हॅक करुन ही माहिती मिळवल्याचा दावा केला होता. त्यानंतर हे प्रकरण चांगलच तापले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरनणाचा तपास एटीएसला करण्याचे आदेश दिले होते. भंगाळे यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. त्यावरील सुनावणीवेळी एटीएसने न्यायालयात वरील बाजू मांडली.
एटीएसची क्लिन चीट खडसेंसाठी दुसरा सुखाचा धक्का आहे. गजानन पाटील लाच प्रकरणात देखील एसीबीने खडसेंना क्लीन चीट दिली आहे.