भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावर आज शिक्कामोर्तब झालं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही घोषणा केली. यावर केंद्रीयमंत्री व भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसेंनी घेतलेला निर्णय त्यांच्या स्वतःसाठी दुर्देवी असल्याचं दानवे म्हणाले आहेत.

”मला असं वाटतं की खडसेंनी जो निर्णय घेतला आहे. तो अत्यंत दुर्देवी आहे. भाजपा पेक्षा हा त्यांच्यासाठी दुर्देवी निर्णय आहे. कारण, भाजपामध्येच त्यांची राजकीय जडणघडण झाली. बाजार समितीपासून ते विधानसभेतील विरोधी पक्षनेते, एकेकाळी या राज्याच्या अर्ध्या मंत्रिमंडळाचे ते प्रमुख होते. परंतु, काही कारणास्तव जसं की सर्वांना माहिती आहे की, राजकीय मुख्य प्रवाहातून ते थोडं बाजूला गेले होते. परंतु, याचा अर्थ असा नव्हता की त्यांनी पक्ष सोडयला पाहिजे होतं. मला असं वाटतं की त्यांच्यासाठी ही अत्यंत दुर्देवाची बाब आहे. त्यांनी पक्ष सोडून जायला नको होतं.” असं रावसाहेब दानवे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.

तसेच, ” हे सर्व नक्कीच निस्तरता आलं असतं, परंतु त्यासाठी काही काळ काही वेळ जाऊ द्यावा लागतो. कारण नाथाभाऊ बद्दल पक्षामध्ये कोणाचंही दुमत नव्हतं. परंतु कायदेशीर बाबी होत्या काही त्या बाबींची पुर्तता झाल्यानंतर नाथाभाऊंना नक्कीच पक्षानं न्याय दिला असता. आपणा सर्वांना माहिती आहे की, नाथाभाऊ आता ज्या पक्षात चालले त्या पक्षाने त्यांच्यावर काही कमी टीका केलेली नाही. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे देखील आरोप आता ते ज्या पक्षात चालले आहेत, त्या पक्षाने केले होते. आता हे सर्व विसरून नाथाभाऊ तिकडं का चालले? हे आता आम्हाला तो पक्षही विचारू शकतो, तुम्ही देखील विचारू शकता. पण मला असं वाटतं हे सर्व नाथाभाऊंसाठी दुर्देवी आहे.” असं देखील त्यांनी बोलून दाखवलं.

”आम्ही बिलकुल कमी पडलो नाही. परंतु, काही बाबी कोर्टात प्रलंबित आहेत. जोपर्यंत कोर्टातून त्या निकाली निघत नाहीत. तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यासाठी असो किंवा कार्यकर्त्यासाठी ती अग्नि परीक्षाच असते. एकदा त्यातून पार पडलं की मग पक्ष निर्णय घ्यायला मोकळा असतो. पण जर कोर्टाचा निर्णय लागण्या अगोदर जर आमच्या पक्षाने काही निर्णय घेतला असता, तर पुन्हा आमच्यावर टीका टिप्पणी झाली असती. नाथाभाऊंबद्दल आमच्या मनात आदर नाही असं नाही. त्यांचं पक्षासाठी योगदान नव्हतं असं नाही. परंतु, आता ते ज्या पक्षात चालले आहेत त्या पक्षानं त्यांच्याविरोधात मोहीम उघडली होती. मला असं वाटतं आता नाथाभाऊ गेलेत, त्यांनी दिल्या घरी सुखी रहावं. आमचे ते मित्र आहेत.आम्ही त्यांना वेगळं काही समजतच नव्हतो. परंतु, त्यांनी जो निर्णय घेतला तो त्यांच्यासाठी दुर्देवी निर्णय आहे.” असंही यावेळी दानवे यांनी स्पष्ट केलं