महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत इतिवृत्तास मंजुरी देताना सत्ताधारी खानदेश विकास आघाडी आणि भाजपच्या सदस्यांमध्ये खडाजंगी होऊन अखेर भाजपच्या सर्व सदस्यांनी सभात्याग केला.

महापौर नितीन लठ्ठा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत सुरुवातीला गोंधळ उडाला. नेहमीप्रमाणे प्रारंभी मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी घेताना भाजपचे नगरसेवक रवींद्र पाटील यांनी मागील सभेच्या इतिवृत्तात चुका असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. विशेष निधीचा वापर पक्षपातीपणे केला जात असून केवळ सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागात कामे होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यास सत्ताधारी ‘खाविआ’चे नेते रमेश जैन यांनी आक्षेप घेत सभेत विषय मंजूर होताना आपण विरोध केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर पाटील यांनी हा मुद्दा बरोबर असल्याचे मान्य केले. मात्र विशेष निधीतून मंजूर होणारी कामे आयत्या वेळच्या विषयात समावेश केली जात असल्याने सदस्यांच्या ते लक्षात येत नसल्याचे नमूद केले. आपल्या मुद्दय़ाची दखल घेतली जात नसल्याचे सांगून पाटील यांनी सभात्याग करत असल्याचे जाहीर केले. भाजपच्या सर्व नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा देत सभात्याग केला. भाजप सदस्यांनी सभात्याग केल्यानंतरही सभेचे कामकाज सुरूच राहिले. दहा विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. त्यात गणेश कॉलनी व मुक्ताईनगर परिसराला जोडणाऱ्या बजरंग पुलाच्या भूमिगत मार्गाचे बांधकाम करण्यासाठी रेल्वे विभागाकडे तीन कोटी ७५ लाख रुपये भरण्यास मंजुरी, शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, शहरात ७५ आणि १०० वॅट एलईडी पथदिवे बसविणे तसेच सामाजिक संस्थांना वितरित करण्यात आलेल्या ३९३ खुल्या जागांबाबत निर्णय घेणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.