जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप पीक कर्जाचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी सामूहिक प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी शुक्रवारी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या खरीप हंगाम २०१६ पीक कर्जवाटप अभियान जिल्हास्तरीय समिती बठकीत त्या बोलत होत्या.

या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) किरण पाणबुडे, पनवेल प्रांत भरत शितोळे, पेण प्रांत श्रीमती प्रेमलता जैतु, रोहा प्रांत सुभाष भागडे, महाड प्रांत श्रीमती सुषमा सातपुते, माणगाव प्रांत विश्वनाथ वेटकोळी, श्रीवर्धन प्रांत तेजस समेळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक टी. मधुसूदन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के.बी. तरकसे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक विद्याधर जुकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. राजू पाटोदकर आदी उपस्थित होते.

पुढे मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाल्या की, या वर्षी शेतकऱ्यांना विविध बँकांमार्फत पीक कर्जवाटपासाठी राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी कालबद्ध कार्यक्रमदेखील ठरविण्यात आलेला आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय समित्यांनी आपापली कामे विहित वेळेत पूर्ण करून पीक कर्ज जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावीत. याकरिता गावोगावी विशेष मेळावे घेऊन त्या ठिकाणी बँकांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पीक कर्जाची माहिती द्यावी. जिल्ह्यातील कोणताही इच्छुक शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.

शून्य टक्के व्याज

या योजनेंतर्गत एक लाखापर्यंत कर्ज घेऊन त्याची दिलेल्या मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पडणारा व्याजदर हा शून्य टक्के आहे. तर एक ते तीन लाखांपर्यंतच्या कर्जास दिलेल्या मुदतीत परतफेड केल्यास प्रत्यक्ष व्याजदर २ टक्के असेल. रायगड जिल्ह्यासाठी या कर्जाची मर्यादा भातपीक ५० हजार रुपये प्रतिहेक्टर, आंबा १ हजार रुपये प्रतिझाड, नारळ ६५० रुपये प्रतिझाड, सुपारी ६० रुपये, अशा प्रकारे आहे. या योजनेंतर्गत २० जूनपर्यंत इच्छुक शेतकऱ्यांना विहित कार्यपद्धती पूर्ण करून त्यांच्या कर्जखाती मंजूर रक्कम जमा करावयाची आहे. त्यामुळे सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी या बठकीत केले.