नागपूर : मागील वर्षी दुष्काळाची झळ सोसणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांना यंदाही अस्मानी संकटाने घेरले आहे. पावसाळा सुरू होऊन तब्बल दीड महिना झाल्यावरही समाधानकारक पाऊस न झाल्याने काही ठिकाणी पेरण्या उलटण्याची भीती आहे. काही ठिकाणी अद्याप पेरण्याही झाल्या नाहीत. पुढच्या काळात पुरेसा पाऊस न झाल्यास खरीप हंगामच संकटात येण्याची शक्यता आहे.

हवामानतज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवडय़ाअखेरीस पाऊस आला तर कमी पावसात केलेल्या १० ते २० टक्के पेरण्या उलटण्याची (दुबार पेरणी) शक्यता आहे. पाऊस आलाच नाही किंवा खूप कमी आला तर परिस्थिती बिकट होईल, असे कृषी अभ्यासक गजानन जाधव यांनी सांगितले. २०१७ या वर्षांत झालेल्या शेतकरी आत्महत्यांपैकी ७० टक्के आत्महत्या या पावसाने पाठ फिरवल्याने आणि पेरण्या वाया गेल्याने झाल्या होत्या. यंदाही हीच स्थिती राहिल्यास शेतकरी आणखी अडचणीत येईल आणि आत्महत्या वाढेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

विदर्भात आतापर्यंत अत्यल्प पाऊस झाला. अमरावती विभागात  १ ते १५ जुलैपर्यंत १३७९ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. यावर्षी ९८० मि.मी. झाला. नागपूर विभागात १ जून ते १५ जुलैपर्यंत १५४० मि.मी. पाऊस पडतो. यावर्षी ८७२.२९ मि.मी. झाला. कमी पावसाचा सर्वाधिक फटका पेरण्यांनाही बसला. सर्वात कमी पेरण्या भंडारा जिल्ह्य़ात (३.३३ टक्के) तर सर्वाधिक बुलढाणा जिल्ह्य़ात (८७.९० टक्के) झाल्या.

कर्जमाफी केल्याने शेतकऱ्यांना पुन्हा पीककर्ज मिळण्याच्या वाटा मोकळ्या झाल्या, असा दावा सरकारने केला असला तरी प्रत्यक्षात जमिनीवरची परिस्थिती वेगळी आहे. केवळ दोनच जिल्ह्य़ात ५० टक्क्यांहून अधिक कर्जवाटप झाले आहे.

सुरुवातीला झालेल्या पावसाच्या आधारावर केलेली धूळ पेरणी, काही ठिकाणी असलेली सिंचन सुविधा यामुळे कृषी खात्याची पेरण्यांची आकडेवारी फुगलेली दिसत असली, तरी कोरडवाहू भागांत पेरण्याच झालेल्या नाहीत. नरखेड तालुक्यात (जि. नागपूर) अद्याप शेतातील माती चिंब भिजवणारा पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्यांची हिंमत तरी कशी करायची, असा सवाल तेथील शेतकरी करतात.

धान पिकाला फटका

भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्य़ात भात हे प्रमुख पीक आहे. यापैकी भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर हे जिल्हे तर भात पिकासाठीच ओळखले जातात. या जिल्ह्य़ांत धानाचे लागवड क्षेत्र ७.३५ हेक्टर आहे. यापैकी आतापर्यंत केवळ ३० हजार ४९० हेक्टर म्हणजे ४.१५ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. नागपूर जिल्ह्य़ात ७९ हजार हेक्टरपैकी केवळ ०.२८ टक्के (२२७ हे.), भंडारा जिल्ह्य़ात १ लाख ८०,१२५ पैकी केवळ ४.०४ टक्के (७२७५ हे.), गोंदिया १ लाख ७७,१११ हेक्टरपैकी फक्त ३.२० टक्के (४,६९८ हे.) आणि गडचिरोली जिल्ह्य़ात १ लाख १५ हजार २०८ हेक्टरपैकी ९.१६ टक्के (१३,८५१ हे.) वरच पेरण्या झाल्या आहेत. धानाच्या रोवणीसाठी शेतात पाणी साचेल असा पाऊस आवश्यक असतो. यंदा असा पाऊसच झाला नाही. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली. जूनच्या अखेरच्या आठवडय़ात कोसळलेला पाऊस गायब झाल्याने पऱ्यांमध्ये भेगा पडल्या आहेत. रोपे करपली आहेत. रोवणीवर मोठे संकट आले आहे. जुलैपर्यंत सरासरी ५० टक्के रोवण्या आटोपतात, पण यंदा केवळ ५ टक्के पेरणी झाल्याचे नागपूर विभागाचे सहसंचालक (कृषी) रवि भोसले यांनी सांगितले.

शेतकरी आत्महत्या

(जून २०१९ पर्यंत)

अमरावती-            ११७

अकोला-                ४३

यवतमाळ-            १०३

बुलढाणा-              ११९

वाशीम-                 ४५

वर्धा-                     १८

नागपूर-                 १५