मृगाचा पाऊसच दमदार होण्याचे सांगली पंचांगवाचनातील भाकीत

येत्या हंगामात नऊपकी पाच नक्षत्रांचे वाहन पर्जन्यसूचक असल्याने आणि मृगाचा पाऊसच दमदार होण्याचा अंदाज असल्याने खरिपाचा पेरा मोत्याचा तुरा लाभण्याची शक्यता आहे, असा अंदाज पंचांगवाचनात करण्यात आला. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सांगली जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील विविध गावात पंचांगवाचनाचे सामुदायिक कार्यक्रम विधिपूर्वक पार पडले. दरवर्षी गुढी पाडव्याला होणाऱ्या या भाकिताकडे अवघ्या राज्याचे लक्ष असते.

प्रथेप्रमाणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात विविध ठिकाणी चावडीच्या कट्टय़ावर, ग्रामदेवतांच्या मंदिरात पंचांगवाचन करण्यात आले. गावच्या भटजींकडून नवीन वर्षांच्या पंचांगाचे पूजन करण्यात आल्यानंतर गावच्या पाटलांच्या संमतीने भटजींनी उपस्थित शेतकऱ्यांसमोर पंचांग वाचन करीत यंदाच्या पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला. पिकपाण्यासाठी पावसाच्या हंगामातील नऊ नक्षत्रे महत्त्वाची मानली जातात. यामुळेच २७ वजा ९ बरोबर किती याचे उत्तर जाणकार शेतकरी शून्य असेच देईल. कारण ही ९ नक्षत्रे जर कोरडी गेली तर सगळेच मुसळ केरात जाण्याचा धोका ठळकपणे समोर दिसतो. यंदा या ९ नक्षत्रांपकी मृग, आद्र्रा, पुनर्वसू, पूर्वा आणि उत्तरा या पाच नक्षत्रांचे वाहन पर्जन्यसूचक मानले जाणारे प्राणी आहेत. मृग आणि उत्तरा नक्षत्राचे वाहन मेंढा असून आद्र्रा आणि पूर्वा नक्षत्राचे वाहन हत्ती आहे, तर पुनर्वसु नक्षत्राचे वाहन बेडूक आहे. ही पाच पर्जन्यसूचक वाहने जादा आणि समाधानकारक पावसाची मानली जातात. तसेच पुष्य नक्षत्राचे वाहन गाढव, हस्त नक्षत्राचे वाहन म्हैस आहे. या नक्षत्रात प्रमाण कमी असले तरी पावसाची शक्यता आहे. यंदाच्या मान्सूनमधील पहिले नक्षत्र ८ जूनपासून सुरू होत असून या ९ नक्षत्रांखेरीज चित्रा आणि स्वाती नक्षत्रातील पावसाचा विचार पंचांगात करण्यात आला आहे. यामध्ये चित्रा नक्षत्राचे वाहन घोडा असून स्वाती नक्षत्राच्या पावसाचे वाहन मोर असल्याने अवकाळी पावसाची शक्यता कमी वर्तवली आहे.  या वर्षीच्या पावसाचे निवासस्थान वाण्याच्या घरी असून मोजूनमापून पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा चार आढक पाउस होण्याचा अंदाज असून यापकी सहा भाग नद्या व पर्वत यावर होईल, तर चार भाग जमिनीवर होईल.

काय होणार?

यंदाच्या पावसाचे निवासस्थान वाण्याच्या घरी असून २५ मेपासून सुरू होणाऱ्या रोहिणीचा पाऊस रानातील मशागतीला थोडाफार उपयुक्त ठरेल. मात्र, मृगाचा पाउस यंदा एक दिवस विलंबाने म्हणजे ८ जूनला सुरू होणार असून या नक्षत्राचे वाहन मेंढा आहे. हे वाहन पर्जन्यसूचक असून प्रारंभीच्या काळात चांगला पाऊस होईल. परिणामी खरिपाचा पेरा करण्यास उपयुक्त ठरणार असून पहिला पेरा मोत्याचा तुरा लाभण्याची चिन्हे आहेत.