वनखात्याला पालिका १२ कोटी देणार

सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई: वसई-विरारकरांच्या भविष्यातील पाण्याची गरज भागविणाऱ्या बहुचर्चित खोलसापाडा धरणाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. वसई-विरार महापालिकेने वनखात्याला १२ कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी पालिकेने दर्शवली आहे. या निर्णयाला येत्या आठवडय़ात होणाऱ्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे. खोलसापाडा हे पालिकेच्या मालकीचे धरण ठरणार असून त्यातून वसई-विरार शहराला दररोज १५ दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा होणार आहे.

सध्या वसई-विरार शहराला सूर्या- धामणी धरणातून १०० दशलक्ष लीटर, सोबत सूर्या टप्पा-३  मधून १०० दशलक्ष लीटर, उसगाव धरणातून २० आणि पेल्हार धरणातून १० दशलक्ष लीटर एवढा पाणीपुरवठा केला जातो. वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी लक्षात घेऊन पालिकेने खोलसापाडा धरण विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. हे धरण लघुपाटबंधारे खात्याच्या अखत्यारित आहे. लघुपाटबंधारे खात्यामार्फत ही पाणीपुरवठा योजना राबवली जाणार आहे. या कामाचा एकूण खर्च ५१ कोटी रुपये एवढा आहे. पालिकेने या धरणाच्या कामाला सप्टेंबर २०१८ मध्ये मंजुरी दिली होती.

या खोलसापाडा धरणातून पालिकेला दररोज १५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होणार आहे. तसेच लघुपाटबंधारे खात्याने मंजुरी देखील दिली आहे. मात्र मार्गातील झाडे कापून दुसऱ्या ठिकाणी ती जागा वनखात्याला देण्यासाठी १२ कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी वनखात्याला एवढी रक्कम भरणे आवश्यक आहे. पालिका आयुक्तांनी यासंदर्भात या आठवडय़ात बैठक बोलावली असून त्यात १२ कोटींच्या निर्णयाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. या धरणाचे काम दोन ते अडीच वर्षांत पूर्ण होणार आहे.

डिसेंबर महिन्यात तत्कालीन आयुक्त निवृत्त झाल्यानंतर पालिकेला आयुक्त मिळाले नव्हते. त्यानंतर करोनाचे संकट उभे ठाकले. दरम्यान महापालिकेचा कार्यकाळ देखील संपला होता आणि सर्वाधिकार नवीन आलेल्या आयुक्तांकडे प्रशासक म्हणून मिळाले. आयुक्त गंगाथरन डी. यांनी या योजनेचा आढावा घेतल्यानंतर लघुपाटबंधारे खात्याने ठेकेदार देखील नेमल्याचे समजले. तरी योजना वनखात्याच्या पैशांमुळे अडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हा निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. करोनाबरोबर लढत असताना दुसरीकडे लोकहिताच्या योजना रखडू नये अशी भूमिका आयुक्तांनी मांडली.

धरणाची वैशिष्टय़े

वसई-विरार शहरापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. शहराला सर्वात जवळ असणारे हे धरण आहे. खोलसापाडा धरणाच्या टप्पा-२ ला लागणारा निधी वसई-विरार महापालिका देणार असून हे धरण संपूर्ण पालिकेच्या मालकीचे असणार आहे. खोलसापाडा-१ या योजनेअंतर्गत पाण्याच्या साठय़ाची व्याप्ती ७.८० चौरस किमी असणार आहे. तर त्यात एकूण पाणीसाठा १३.०६४ दशलक्ष घनमीटर एवढा असणार आहे. या धरणातून पिण्यासाठी १२.८१८३ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाची संपूर्ण मालकी महानगरपालिकेची असणार आहे. धरणातील १००% पाणी महानगरपालिकेसाठी आरक्षित राहील. पाटबंधारे विभाग फक्त प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे.

लोकसंख्येच्या दृष्टीने नियोजन

वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाख झाली आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रस्तावित आराखडय़ात पुढील २० वर्षांत वसई-विरार शहरातील लोकसंख्या ४५ लाख एवढी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली

आहे. त्यामुळे वसई-विरार महापालिकेने भविष्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पर्यायी स्त्रोत शोधणे सुरू केले होते. पालिकेने एकीकडे देहरजा धरण उभारण्याचे काम सुरू केले आहे.

तर दुसऱ्या ठिकाणी राजावली, तिल्हेर आणि सातिवली या ठिकाणी साठवण तलाव तयार केले जाणार आहेत.

खोलसापाडा धरण योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहरातील नागरिकांच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. त्यासाठी वनखात्याला १२ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला असून या आठवडय़ात होणाऱ्या बैठकीत घेतला जाईल.

– गंगाथरन डी., आयुक्त, वसई-विरार महापालिका