लक्ष्मण राऊत

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वादाला पक्षीय स्वरूप

जालना जिल्ह्य़ात एकेकाळी जवळचे मित्र असणारे शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यातील परस्परांवरील आरोप-प्रत्यारोप तसेच आव्हाने-प्रतिआव्हानांच्या फैरी गेल्या काही महिन्यांपासून अधिकच तीव्र होत चालल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या दोन्ही मातब्बर पुढाऱ्यांच्या वादास आता पक्षीय स्वरूप आलेले आहे.

आगामी लोकसभेसाठी खोतकर हे दानवेंच्या विरुद्ध उभे राहतील असा कयास बांधून भाजपने आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्वत: खोतकर यांनी अद्याप आपण काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याचे किंवा त्यासाठी इच्छुक असल्याचे कोणत्याही व्यासपीठावरून जाहीर वक्तव्य केलेले नसले तरी दानवे यांनी तसे गृहीत धरून खोतकर यांच्यावर टीका करणे सुरू केले आहे. अलीकडेच जालना तालुक्यातील भीलपुरी येथे भाजपच्या मेळाव्यात दानवे यांनी आपल्या विरोधात खोतकर आणि काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार एकत्र आल्याचा आरोप केला, तसेच कुणीही एकत्र आले तरी आपला पराभव करणे शक्य नसल्याचेही सांगितले. खोतकर यांचा प्रभाव असलेल्या जालना विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात दानवे यांनी अनेक कार्यक्रम अलीकडच्या काळात घेतले आहेत. अगदी दिवाळी स्नेहमीलनाच्या कार्यक्रमांतही खोतकर यांना दानवे यांनी लक्ष्य केलेले आहे.

जालना लोकसभा मतदारसंघातील सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी खोतकर यांच्या उपस्थित झालेल्या स्थानिक नगर परिषदेच्या कार्यक्रमात तर ‘अर्जुनाचा बाण सोडून’ येत्या निवडणुकीत दानवे यांना घरी बसविण्याची प्रतिज्ञाच केली आहे. शिवसेनेचे जालना जिल्हा संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत अलीकडेच जालना आणि बदनापूर येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यांत खोतकर यांनी दानवे यांच्यावर वर्तणूक आणि शिवसनिकांवरील दडपशाहीच्या अनुषंगाने जोरदार टीका केली. दानवे शिवसेना संपवायला निघाले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत आपण त्यांचा पराभव करू, असे खोतकर यांनी सांगितले. युती झाली तरी मत्रीपूर्ण लढत देऊन हा मतदारसंघ दानवे यांच्यापासून मुक्त करू, असेही ते म्हणाले.

दोन वेळेस आमदार राहिल्यानंतर पहिल्यांदा १९९९ मध्ये दानवे यांनी लोकसभा निवडणूक लढविली. त्यानंतर सलग चार वेळेस दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांचा पराभव करून विजयी झालेले आहेत. निवडणुकीच्या राजकारणात दानवे वाकगबार समजले जातात. खोतकर आणि दानवे हे दोघेही जिल्ह्य़ातील प्रभावी नेते आहेत. मागील २५ वर्षांपेक्षा अधिक काळ या दोघांचाही जिल्ह्य़ातील जिल्हा परिषद, नगर परिषदा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इत्यादी संस्थांवर प्रभाव राहिलेला आहे. अगोदर केंद्रीय राज्यमंत्री आणि त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्याने सत्तेत दानवे यांचे महत्त्व मोठय़ा प्रमाणावर वाढलेले आहे. या सत्तेच्या बळावर दानवे दडपशाही करतात, असा आरोप शिवसेनेच्या अनेक मेळाव्यांमध्ये झालेला आहे. या पार्श्वभूमीवर खोतकर आणि दानवे यांच्यातील राजकीय संघर्ष अलीकडच्या काळात अधिक तीव्र झालेला आहे.

भाजप युतीबद्दल आशावादी

भाजप जालना जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे यांनी सांगितले की, शिवसेनेशी युती करून लोकसभा निवडणूक लढवावी असे मत राज्यातील भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी यापूर्वी अनेकदा व्यक्त केलेले आहे. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात पूर्वतयारीसाठी मेळावे घेण्यात येत आहेत. शिवसेना आणि भाजपमध्ये जिल्ह्य़ात असलेले मतभेद संपुष्टात यावेत आणि आगामी निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचा पराभव व्हावा या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप होण्याचे काही प्रकार घडत असले तरी निवडणुकीच्या वेळी युती होईल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. दानवे यांच्या नेतृत्वाखाली जालना लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांमुळे काँग्रेसच्या नेतेमंडळींना आपण पुन्हा यशस्वी होणार नाही याची जाणीव झालेली आहे. मागील सहा निवडणुकांप्रमाणे भाजपचा या वेळेसही वजय होईल.

काँग्रेसलाही विजयाची आशा

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य भीमराव डोंगरे म्हणाले की, मागील सहा लोकसभा निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला असला तरी या वेळेस मात्र तसे होणार नाही. यापूर्वी १९९८ मध्ये काँग्रेसचा पराभव फक्त ११०८ मतांनी झाला होता. १९९९ मध्ये भाजपचा विजय झाला असला तरी त्या वेळी स्वतंत्ररीत्या लढलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित मते भाजप उमेदवारापेक्षा ५० हजारांनी अधिक होती. २००९ मध्ये भाजपचा विजय आठ हजार ४०२ एवढय़ा मतांनी झाला होता. त्यामुळे नियोजनबद्धरीत्या निवडणूक लढविली तरी या मतदारसंघात काँग्रेसला विजय अशक्य नाही. भाजपच्या सरकारने अनेक घोषणा केल्या आणि आश्वासने दिली असली तरी प्रत्यक्षात मात्र कृती केलेली नाही. सर्वसामान्य जनता, कष्टकरी आणि शेतकऱ्यांमध्ये भाजपबद्दल नाराजी आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतील विजयाबद्दल आम्ही प्रचंड आशावादी आहोत.