24 November 2017

News Flash

अपहृत व्यापाऱ्याची अवघ्या चोवीस तासांत सुटका

पंधरा कोटीच्या खंडणीसाठी पिंपळगाव बसवंत येथील व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या टोळीला अवघ्या चोवीस तासात

प्रतिनिधी , नाशिक | Updated: December 22, 2012 3:27 AM

पंधरा कोटीच्या खंडणीसाठी पिंपळगाव बसवंत येथील व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या टोळीला अवघ्या  चोवीस तासात संगमनेर तालुक्यातून जेरबंद करण्यात नाशिक व नगर ग्रामीण पोलीस दलाच्या संयुक्त पथकास यश आले.
अपहृत व्यापाऱ्याची सुरक्षितपणे सुटका करत टोळीतील आठ संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पाच कोटीची रक्कम, तीन गावठी पिस्तुले व ७८ जिवंत काडतुसे, दोन मोटारसायकल, कार, तसेच सात भ्रमणध्वनी व कार्ड हस्तगत करण्यात आली. टोळीतील दोन संशयित अद्याप फरार आहेत. गृहमंत्र्यांनी जाहीर केलेले एक लाख रूपयांचे पारितोषिक प्रत्यक्ष कार्यवाहीत सहभागी झालेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना विभागून दिले जाणार आहे.
१९ डिसेंबर रोजी सायंकाळी पिंपळगाव बसवंत येथील बडय़ा कांदा व्यापाऱ्याचे बंधू शंकरलाल ठक्कर (५५) यांचे जुन्या कांदा मार्केटजवळून या टोळक्याने अपहरण केले होते. त्यानंतर टोळीने ठक्कर यांच्या नातेवाईकांकडे १५ कोटी रूपयांची मागणी केली. ठक्कर कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक धनंजय कमलाकर यांनी वेगाने सूत्रे फिरविली. ठक्कर कुटुंबियांना अपहरणकर्त्यांशी तडजोड करण्यास सांगून दरम्यानच्या काळात पोलीस अधीक्षक प्रवीण पडवळ व अपर पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची पथके तयार करण्यात आली. ठक्कर कुटुंबियांनी तडजोड करून खंडणीची रक्कम पाच कोटी केली. अपहरणकर्त्यांनी ही रक्कम संगमनेर तालुक्यातील शिबलापूर रस्त्यावरील निर्जनस्थळी देण्यास सांगितले होते. त्यानुसार ही रक्कम स्वीकारल्यानंतर या परिसरात तळ ठोकून असलेल्या संगमनेर व नगरच्या पोलीस पथकाने संगमनेरचा संपूर्ण ग्रामीण भाग पिंजून काढला आणि ८ संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांकडून खंडणीचे घेतलेले पाच कोटी रूपयेही हस्तगत करण्यात आले. संशयितांमध्ये सुनील भाऊराव पिठे (२५), सुनील भाऊराव पिठे (१९), सागर विजय गवळी (२१), मुलाणी दाऊद हुसेन (२१), तुषार विक्रम बैरागी (२०), अर्जुन मधुकर रहाणे (२५), योगेश दौलत गडाख (२१), कोंडाजी चंद्रभान वाडेकर (२१) यांचा समावेश आहे.अपहरणकांडातील बहुतांश संशयित पिंपळगाव बसवंत गाव व परिसरातील असून एक जण संगमनेरमधील खरशिंदे येथील आहे. तरूणांनी झटपट श्रीमंत होण्याच्या उद्देशाने हा कट रचला होता.

First Published on December 22, 2012 3:27 am

Web Title: kidnapped businessman released within 24 hours
टॅग Crime,Kidnapped