पोलीस पथकांचा अनेक शहरांत तपास

अकोल्यातील किडनी तस्करी प्रकरणात नवे धागेदोरे समोर येत आहे. या प्रकरणात आणखी एका महिलेने किडनी प्रत्यारोपण केले का, याची खातरजमा करण्यासाठी वैद्यकीय समितीने गुरुवारी त्या महिलेची तपासणी केली. वैद्यकीय समिती पोलिसांकडे उद्या अहवाल सादर करणार आहे. या प्रकरणी पोलीस कोठडीतील आरोपींकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांची दोन पथके नागपूरसह इतर शहरांमध्ये तपास करीत आहेत.
किडनी तस्करी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शिवाजी कोळी तसेच विनोद पवार यांनी स्वत:साठीच किडनी खरेदी व विक्री केल्यानंतर ते या तस्करीत उतरले होते. या प्रकरणात गुरुवारी नांदुरा येथील एका महिलेची तपासणी करण्यात आली. या अगोदर पोलिसांनी वैद्यकीय समितीकडे प्रश्नावली पाठवून त्याची माहिती मागितली होती. अधिष्ठाता डॉ.राजेश कार्यकर्ते यांच्यासह तीन तज्ज्ञांच्या समितीने त्या मुद्यांवर आपला अहवाल सादर केला असून, त्या अहवालाच्या अभ्यासानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहे.
कोळीने दिलेल्या माहितीनुसार नागपुरात तपासणी केलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी करण्यात आली. औरंगाबाद येथे खरात यांची काढलेली किडनी नांदूरा येथील एका महिला लाभार्थीला लावल्याची माहिती आहे. किडनी तस्करी प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत आहे. वैद्यकीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरेल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.