अकोल्यातील किडनी तस्करी प्रकरणाच्या राज्यव्यापी तपासाला चांगलाच वेग येत आहे. पोलीस तपासात या प्रकरणाचे मुंबईसह पुणे ‘कनेक्शन’ उघड झाल्याची माहिती आहे. मुख्य सूत्रधाराला घेऊन पोलीस पथक त्या शहरांमध्ये तपास करणार आहे. दरम्यान, मुख्य सूत्रधार शिवाजी कोळी याच्या पोलीस कोठडी आज, मंगळवारी २० डिसेंबपर्यंत वाढविली आहे. न्यायालयाने आरोपी देवेंद्र शिरसाट याची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिल्यावर दुसऱ्या एका गुन्ह्य़ाखाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
अकोला पोलिसांनी मुख्य सूत्रधार शिवाजी कोळी, विनोद पवार, आनंद जाधव आणि देवेंद्र शिरसाट यांची कसून चौकशी केली. सांगली येथे तपासासाठी गेलेले पोलिसांचे एक पथक मुख्य सूत्रधार शिवाजी कोळीला घेऊन आज अकोल्यात आले. कोळीची पोलीस कोठडी संपल्याने त्यालाही न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणात मुंबई, पुणे व औरंगाबाद ‘कनेक्शन’ असल्याने कोळीला २९ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोळीला घेऊन पोलीस पथकाने नागपुरमध्ये तपास केला. कोळी याच्या मुळ गावी पोलिसांकडून सखोल तपास करण्यात आला. त्या ठिकाणी पोलिसांनी काही कागदपत्रेही जप्त केले. आता शिवाजी कोळीला घेऊन पोलीस पथक मुंबई, पुणे व औरंगाबाद येथे जाणार आहे. औरंगाबाद येथील एका मोठा रुग्णालयाचा या प्रकरणाशी सुरुवातीपासूनच संबंध उघड झाला आहे. आता मुंबईतील तीन मोठय़ा रुग्णालयातही किडनी प्रत्यारोपणाचा प्रकार झाल्याची माहिती तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.