05 July 2020

News Flash

किडनी प्रत्यारोपणाने शिवप्रियाची नवीन पहाट

किडणीच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या शिवप्रिया ध्रुवबाळ सावंत हिला किडनी प्रत्यारोपण केल्याने नवीन आयुष्य लाभले आहे.

किडणीच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या शिवप्रिया ध्रुवबाळ सावंत हिला किडनी प्रत्यारोपण केल्याने नवीन आयुष्य लाभले आहे. मूळची बांद्यातील शिवप्रिया सावंत गेली आठ वर्षे किडनीच्या आजाराला तोंड देत होती. तिचे वडील डी. के. सावंत व मातोश्री यांच्या अथक प्रयत्नांमुळे किडनी मॅच होऊन ती प्रत्यारोपण करून या हसऱ्याखेळत्या कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
द्वारका कृष्ण पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष डी. के. सावंत मूळचे बांदा गावचे सुपुत्र आहेत. त्यांची मुलगी शिवप्रिया सावंत गेली आठ वर्षे किडनीच्या आजाराने त्रस्त होती. वैद्यकीय सल्ला मिळेल तेथे उपचारासाठी त्यांनी तिला नेले. तिची आई मंत्रालयात नोकरीस आहे. शिवप्रियाच्या आई-वडिलांनी मुलीच्या जीवनात आनंद आणण्यासाठी केलेली धावपळ किडनी प्रत्यारोपणामुळे फळास आली.
मुंबईत आई-वडील-भाऊ यांच्यासह शिवप्रिया सावंत राहत होती. सुखी-समाधानी कुटुंबात राहणाऱ्या शिवप्रियाने वाणिज्य शाखेतून विशेष गुणावत्तेसह पदवी संपादन केलेली होती. मुंबई महापालिकेत साठ हजार उमेदवारांतून तिची नोकरीसाठी निवड झाली. ती बीईएसटीत नोकरीस होती. ती कुटुंबात सुखकर व आनंदी राहत होती. शिवप्रियाला नोकरी मिळाल्यानंतर पाच-सहा महिन्यांनी अचानक हिमोग्लोबिन कमी होऊ लागले, तपासणी करण्यात आल्यावर तिच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याचा निष्कर्ष आला. या तरुण मुलीच्या या आजाराने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या आजाराने गेली आठ वर्षे धावपळ, चिंता सुरू होती. आठवडय़ाला तीन वेळा डायलेसीस करण्यात येत होते.
किडनी प्रत्यारोपण करायचे ठरले, पण त्यासाठी खूप पैशांची गरज होती. कुटुंब हेलावून गेले होते. आई मंत्रालयात व वडील पर्यटन व्यवसाय सांभाळत मुलीच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी धडपडत होते. तब्बल आठ वर्षे किडनीच्या आजाराने त्रस्त मुलीच्या उपचारासाठी नाचविले, पण जिद्द सोडली नव्हती.
किडनी प्रत्यारोपणासाठी नाव नोंदले होते. एके दिवशी जसलोक रुग्णालयातून फोन आला, एक किडनी आहे. पण शिवप्रियाचा नंबर पाचवा होता. आई-वडिलांसमोर आशेचा किरण उभा राहिला.
सुदैवाने नालासोपारा येथील ४३ वर्षीय व्यक्तीची ती किडनी होती. २२ मार्चला तिला रुग्णालयात उलटय़ा होत असल्याने दाखल केले असता किडनी दान करणाऱ्या या व्यक्तीच्या मेंदूत रक्तस्रावाने ब्रेनडेड असल्याचे उघड झाले. त्याच्या पत्नीने यकृत व दोन किडण्या दान करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा शिवप्रियासह अन्य चार रुग्णांची चाचणी घेतली असता शिवप्रियाशी किडनी मॅच झाली. जसलोकनंतर हिंदुजात शिवप्रियाला दाखल केले.
अवयवदान करणारी व्यक्ती आमच्यासाठी देवदूत आहे. अवयवदानाचे महत्त्व मोठे आहे. प्रत्येकाने अवयवदानाचा निर्णय घेतला पाहिजे, असे डी. के. सावंत म्हणाले. हिंदुजा रुग्णालयातील डॉ. सुचेता देसाई यांच्यासह मित्रमंडळींनी मोठी साथ दिली. त्यामुळे आमच्या कुटुंबात पुन्हा आनंद पसरला आहे, असे डी. के. सावंत म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2016 1:17 am

Web Title: kidney transplantation operation
Next Stories
1 वाळुशिल्पातून अखंड महाराष्ट्राचा नारा
2 काँग्रेसचे स्वतंत्र पॅनेल, सेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र
3 ग्रामपंचायतींचे कोटय़धीश होण्याचे स्वप्न भंगणार
Just Now!
X