सांगली : सगळय़ा जगाचे लक्ष लागलेल्या थायलंडमधील शोधकार्यात किलरेस्कर समूहाच्या दोन अभियंत्यांनी मोलाचे योगदान दिल्याचे पुढे आले आहे. थायलंडमधील या गुहेत अडकलेल्या फूटबॉल खेळाडूंची सुटका करताना वापरल्या गेलेल्या उपसा पंप तंत्रज्ञानातील निष्णात अभियंते म्हणून किर्लोस्कर कंपनीत कार्यरत असलेल्या सांगलीतील प्रसाद कुलकर्णी आणि त्यांच्या सोबत पुण्यातील अन्य एक अभियंते यांना येथे पाचारण केले होते. मदतकार्य करणाऱ्या बचाव पथकात ते सहभागी झाले होते.

थायलंडमधील या गुहेत १२ लहान मुलांचा फूटबॉल संघ प्रशिक्षकासह फिरण्यासाठी गेले असता नदीला आलेल्या पुरामुळे अडकले होते. ही गुहा १० किलोमीटर लांबीची असून आतमध्ये ४ किलोमीटरवर ही मुले अडकली होती. ही मुले अडकल्याचे समजताच त्यांच्या सुटकेसाठी थायलंड सरकारबरोबरच जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला होता. थायलंड सरकारने त्यांच्या बचावपथकाच्या जोडीला या  विषयातील जगभरातील तज्ज्ञ व्यक्ती, गटांना मदतीचे आवाहन केले होते.

या मदतकार्यात गुहेत खोलवर साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी पाण्यात राहून कार्यरत राहणाऱ्या शक्तिशाली उपसा पंपाची गरज होती. तसेच हे पंप विनाअडथळा सातत्याने सुरू ठेवणे हे देखील या मदतकार्यातील एक आव्हान होते. भारतातील किलरेस्कर उद्योग समूहाच्या सांगलीतील (किलरेस्करवाडी) ‘किलरेस्कर ब्रदर्स’ या कंपनीकडे या विषयातील तज्ज्ञता आणि अनुभव गाठीशी असल्याने त्यांनी याबाबत मदतीचा हात देऊ केला. या मदतीला थायलंड सरकारनेही लगेच प्रतिसाद दिल्यावर किलरेस्कर कंपनीच्या वतीने शुक्रवारीच कुलकर्णी यांच्यासह दोन अभियंत्यांना थायलंडला पाठवण्यात आले. या दोन तंत्रज्ञांमध्ये सांगलीतील कुलकर्णी यांचा समावेश होता. त्यांच्या जोडीला असलेल्या पुण्यातील दुसऱ्या अभियंत्यांचे नाव समजू शकले नाही.

शुक्रवारी रात्री थायलंडला पोहोचलेले हे दोन्ही अभियंते शनिवारपासूनच या बचावकार्यात सहभागी झाले. या गुहेत अडकलेल्या मुलांच्या सुटकेसाठी गुहेत शिरलेले पाणी बाहेर उपसणे आवश्यक होते. पण पाण्यात राहून या पंपाचे निरंतर कार्य सुरू ठेवणे अवघड जात होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत पंपांचे काम निरंतर सुरू कसे ठेवायचे याबाबत हे दोघेही अभियंते जाणकार आहेत. त्यांचा हा अनुभव इथे उपयोगी आला आणि गुहेत शिरलेले पाणी मोकळे होण्यास मदत झाल्याचे प्रसाद कुलकर्णीचे बंधू किशोर कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले

गेले तीन दिवस उपसा पंपाचे हे कार्य अथकपणे सुरू ठेवल्यानंतर मंगळवारी गुहेत खोलवर अडकलेल्या मुलांपर्यंत जाणे बचावपथकाला शक्य झाले आणि अडकलेल्या सर्व १२ मुलांची आज अखेर सुटका झाली. अन्य देशांत उद्भवलेल्या या विचित्र संकटात मदत केल्याबद्दल या दोन्ही अभियंत्यांचे आणि किलरेस्कर उद्योग समूहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.