ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे लिखित ‘किनाऱ्यावरचा कालपुरुष’ या खंडकाव्याच्या रूपाने केलेले काव्यात्मक शब्दचित्रण नाटकाच्या स्वरूपात नाटय़प्रेमींच्या भेटीस येत आहे. ‘किनाऱ्यावरचा कालपुरुष’ या नाटकाचा प्रयोग ३१ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे होणार आहे.
याबाबतची माहिती नाटय़ निर्माती डॉ. मनीषा जगताप यांनी दिली. किनाऱ्यावरचा या खंडकाव्यात कांबळे यांनी कल्पिलेल्या कालपुरुषाचा माणसाच्या उगमापासून ते आजपर्यंतच्या प्रवासाचा आत्मसंवाद चितारलेला आहे. दीर्घकाव्यातून समुद्र आणि माणूस यांच्यातील नात्याची वेगळी गुंफण अनुभवायला मिळते. खंडकाव्याचे नाटय़ रूपांतर दत्ता पाटील यांनी केले आहे. तसेच कविता, नाटक, तत्त्वज्ञान, संगीत आणि नृत्य या सर्व कलांचा सचिन शिंदे यांनी नाटकात अनोख्या पद्धतीने वापर केला आहे. नाटय़ अभिनेता राम दौंड प्रमुख भूमिकेत असून किरण भालेराव, प्रियंका बिरारी यांच्यासह श्वेता कासव, मध्यमा गुर्जर, ओजस्विनी पंडित, पूर्वा टकले, प्रणाली माळवे यांनी सहकलावंतांच्या भूमिका साकारल्या आहेत. विनोद राठोड यांची प्रकाशयोजना, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा मोहिनी पोतदार, नेपथ्य बाळकृष्ण तिडके, संगीत सुयोग देशपांडे, चित्रफीत लक्ष्मण कोकणे, नृत्य दिग्दर्शन सुमुखी अथनी यांनी केले आहे. नाटय़ प्रयोगाचे राज्यात विविध ठिकाणी प्रयोग होणार असून, नाशिककरांनी या प्रयोगास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन डॉ. मनीषा जगताप व फ्रेंड सर्कलचे जयप्रकाश जातेगावकर यांनी केले आहे.