मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या परिवाराने २०१४ साली अन्वय नाईक यांच्याकडून रायगड जिल्ह्यतील कोर्लेई येथील जमिनी आणि मालमत्ता खरेदी केल्या. मात्र २०२० पर्यंत या जमिनींवरील मालमत्ता आपल्या नावावर चढविल्या नाहीत. बेनामी मालमत्ता म्हणून सहा वर्षे त्यांनी वापरली. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातही त्यांनी जमिनीवरील १९ मालमत्तांचा उल्लेख केलेला नाही, ही माहिती लपविली असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.
ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. अन्वय नाईक यांच्याकडून ठाकरे आणि वायकर परिवाराने २१ मार्च २०१४ ला कोर्लई येथील ३० जमिनी खरेदी केल्या. या जमिनींवर ५५० चौरस फुट पासून २५०० चौरस फुट पर्यंतच्या १९ घरे अस्तित्वात आहेत. ज्यांचे शासनाच्या रेडीरेकनर दरानुसार मुल्य हे पाच कोटी २९ लाख येवढे आहे. मात्र ही घरे १३ नोव्हेंबर २०२० पर्यंत ग्रामपंचायतीत दिवंगत अन्वय नाईक यांच्या नावावरच होत्या. ठाकरे आणि वायकर परिवाराने या मालमत्ता नावावर व्हाव्यात यासाठी अर्जही केले नाहीत. त्यामुळे व्यवहार झाल्यानंतर ६ वर्षे या मालमत्ता बेनामी पध्दतीने या दोन्ही परिवारांनी वापरल्याचा दावा सोमैय्या यांनी केला. तसेच मृतव्यक्तीच्या नावे असलेल्या जागा दुसऱ्यांच्या नावांवर करतांना ग्रामपंचायतीने अन्वय नाईक यांच्या कुटूंबियांचा ना हरकत दाखल घेतला नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या जमिनींचा उल्लेख आहे. मात्र जमिनींसोबत खरेदी केलेल्या १९ मालमत्तांचा उल्लेख दिसून येत नसल्याचेही सोमैय्या यांनी यावेळी सांगीतले, त्यामुळे या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीच्या नाहरकत दाखल्यानंतरही या मालमत्ता ठाकरे आणि वायकर यांच्या परिववाराच्या नावावर करण्यात आल्या आहेत असे कोर्लईचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 9, 2021 1:25 am