गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्याचं सत्र किरीट सोमय्या यांनी सुरू केलं आहे. आजही ते कराडमध्ये पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी ते कोणता नवा गौप्यस्फोट करणार, ठाकरे सरकारवर निशाणा साधत ते काय बोलणार हे पाहण्यासारखं होतं. किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा रोखणं, पोलिसांनी नोटीस बजावणं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. यावेळी बोलताना सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.  पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे की, घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक केली जात आहे. मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करायची आहे, तक्रारदाराला राखण्याचे काम, जिल्हाबंदी करण्याचे काम ठाकरे सरकारने केलं आहे. मला दिलीप वळसे पाटील यांना विचारायचे आहे की मला कोणत्या आदेशा अंर्तगत गणेश विसर्जन करण्यापासून रोखलं, मला माझ्या कार्यालयात कोंडून ठेवण्यात आलं.

ते पुढे म्हणाले, ठाकरे सरकारची ठोकशाही बघा, CSMT मध्ये मला धक्काबुक्की केली, ट्रेन मिळू नये यासाठी मला स्टेशन बाहेर अडवलं. मी त्यांना विचारलं कोणत्या नियमा अंतर्गत अडवत आहेत त्यावर कोल्हापूर जिल्हाधिकारी यांचे पत्र दाखवले. त्या ऑर्डर चॅलेंज केलं ते पळून गेले, ठाकरे सरकारचे पोलीस खोटी ऑर्डर दाखवतात, व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा आणतात, ठाकरे सरकारने हिरवा रंग धारण केला असेल, भगवा रंग सोडून दिला असेल. पण ते मला गणपती विसर्जनापासून रोखू शकत नाहीत.

उद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणा मी चालू देणार नाही, याविरोधात मी उच्च न्यायालयात जाणार. पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, बोगस ऑर्डर दाखवणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्तांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. अद्यापही आदेशात नक्की काय लिहिलंय याविषयी आपणाला नीट कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, कायदा व सुव्यवस्थेच्या कारणामुळे आपणाला मुंबईबाहेर जाता येणार नाही, अशी माहिती मला पोलिसांनी दिली. ते हेही म्हणाले की तुमच्यावर गनिमी काव्याने हल्ला होऊ शकतो. जर असं होतं तर मग तुम्ही माझ्या सुरक्षा यंत्रणेला याविषयीची माहिती का दिली नाही?