अनिल परब, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ अशा सत्ताधारी मंत्र्यांनंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वळवला आहे. काल गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचं कारण देत सोमय्या यांना विसर्जनात सहभागी होण्यापासून अडवण्यात आलं तर त्यांचा कोल्हापूर दौराही पोलिसांनी होऊ दिला नाही. त्यांना कराडमध्येच अडवण्यात आलं. यावेळी सोमय्या यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्र्यांवरच प्रहार केले आहेत.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्या म्हणाले, मी गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार आहे. तिथेही मोठा गैरव्यवहार घडलेला आहे. पुढच्या सोमवारी २७ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये बंगल्यांचा जो घोटाळा केला आहे, त्याची पाहणी मी करणार आहे. तर अजित पवारांनी जो बेनामी कारखाना विकत घेतला आहे, जरंडेश्वर कारखाना त्याची पाहणी करायला ३० तारखेला जाणार आहे.

हेही वाचा – हसन मुश्रीफांचा तिसरा घोटाळा लवकरच बाहेर काढणार; किरीट सोमय्या यांचा इशारा

अनिल परब, अनिल देशमुख अशा सत्ताधारी मंत्र्यांनंतर आता किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वळवला आहे. मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावेच आपण आयकर विभागाकडे सादर केल्याचं किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं. तसेच, फक्त हसन मुश्रीफच नाही, तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या नावे हे पुरावे असल्याचं ते म्हणाले होते. मुश्रीफ यांच्या विरोधातला तिसरा घोटाळा लवकरच बाहेर काढणार असल्याचं त्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

“मी राज्य सरकारमधील ११ भ्रष्टाचारी मंत्र्यांची यादी जाहीर केली होती. पण दुर्दैवाने ११ जणांच्या टीममध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढायला लागली आहे. हसन मुश्रीफ यांचं नाव राखीव खेळाडूंमध्ये आम्ही वाढवत आहोत. हसन मुश्रीफ परिवाराने शेकडो कोटींचे घोटाळे केले आहेत. बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती केल्याचे माझ्याकडे २७०० पानांचे पुरावे आहेत. ते मी आयकर विभागाला सोपवले आहेत”, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.