12 July 2020

News Flash

‘किर्लोस्कर’ उद्योग समूहाची ध्येयपूर्ण शतकी वाटचाल..

जागतिक बाजारपेठेत अधिक विस्ताराची महत्त्वाकांक्षा

|| भक्ती बिसुरे

जागतिक बाजारपेठेत अधिक विस्ताराची महत्त्वाकांक्षा

राज्यातील अक्षरश: उजाड माळरानावर व्यवसाय उभारला जाऊ शकतो हा विश्वास सार्थ करीत मराठी माणसाला व्यवसाय कसा करावा, याचे धडे देणाऱ्या किर्लोस्कर उद्योग समूहाचे १५ जानेवारी १९२० रोजी ‘किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड’मध्ये रूपांतर झाले. या घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत असताना जागतिक बाजारपेठेत आणखी विस्ताराचे ध्येय कंपनीने समोर ठेवले आहे.

कंपनीच्या कारकीर्दीचा आढावा घेण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन आज, रविवारी (१० मार्च) करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संजय किर्लोस्कर यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला.

सन १८८८ मध्ये सुरू झालेल्या किर्लोस्कर उद्योग समूहाचे रूपांतर १९२० मध्ये ‘किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड’मध्ये झाले. त्यानंतर अफाट परिश्रमाच्या जोरावर ६ ते १० हजार नागरिकांना रोजगार देणारा आणि ७०हून अधिक देशांमध्ये आपली उत्पादने पोहोचविणारा हजारो कोटींची उलाढाल करणारा हा उद्योग समूह मराठी जन आणि मनांसाठी अभिमानाचा विषय ठरला.

बदलत्या काळाबरोबर देशाच्या तसेच जगाच्या बाजारपेठेतील गरजांचा विचार करून दर्जा आणि गुणवत्ता यांच्या बळावर जागतिक बाजारपेठेत भारतीय कंपनी म्हणून विस्तार कायम ठेवणे हे किर्लोस्कर उद्योग समूहाचे यापुढेही उद्दिष्ट असल्याचे ‘किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर यांनी या वेळी सांगितले.

संजय किर्लोस्कर म्हणाले, की माझे पणजोबा लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी उद्योगधंद्यात काम करण्यास सुरुवात केली त्या काळात उत्पादनाची गुणवत्ता ब्रिटिश ठरवत असत. मात्र मोठा आत्मविश्वास आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी उत्पादन सुरू केले. सन १९२० मध्ये कंपनी अस्तित्वात आली त्या वेळी औंध संस्थानने कंपनीला पस्तीस वर्षे कर न भरण्याची सूट दिली होती. शंभर वर्षांच्या वाटचालीकडे वळून पाहताना या सकारात्मक घटनांचे स्मरण होते. भारताकडे जागतिक दर्जाचे उत्पादन करण्याची क्षमता आहे हे दर्शवण्यासाठी त्यांनी तसेच आजोबा शंतनुराव आणि वडील चंद्रकांत यांनी दाखवलेली इच्छाशक्ती, महत्त्वाकांक्षा आजही प्रेरणादायी आहे. काळाच्या पुढे विचार करण्याची दिशा त्यांनी कंपनीला दिली.

पुणे, देवास, किर्लोस्करवाडी येथील कारखान्यातून जगभरातील सर्व यंत्रणांचे काम आम्हाला पाहता येते. ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’सारख्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी किर्लोस्करची उत्पादने विश्वासाने वापरली जातात, हा विश्वास आणि दर्जा कायम राखत जागतिक स्तरावर भारतीय उत्पादक म्हणून अग्रभागी राहणे हेच ‘किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड’चे उद्दिष्ट राहणार आहे, असेही किर्लोस्कर यांनी सांगितले.

नेहमीच आघाडीवर..

सन १९३७ मध्ये निर्यात केलेल्या उसाच्या गाळप यंत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने ते परत मागवून, सुधारणा करून पाठवण्यात आले होते. कोणतेही उत्पादन परिपूर्ण व्हावे हा कटाक्ष अशाप्रकारे वारसाहक्काने मिळाला आहे. त्यामुळे विश्वासार्हतेच्या कसोटीवर किर्लोस्कर उद्योग समूह नेहमीच आघाडीवर राहिला आहे. आलोक आणि रमा किर्लोस्कर अशी पाचवी पिढी आता कार्यरत झाली आहे. जागतिक बाजारपेठेत होणारे संशोधन, बदलत्या गरजा आणि तंत्रज्ञान यांच्याशी जुळवून घेत वाटचाल सुरू आहे, असेही संजय किर्लोस्कर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2019 12:42 am

Web Title: kirloskar group celebration of 100 years completed
Next Stories
1 सात नक्षलवाद्यांना यमसदनी धाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा अकस्मात मृत्यू
2 मावळमधील डान्सबारमध्ये गोळीबार; पीएसआय जखमी, दोन जण ताब्यात
3 शहरातील तापमानात पुन्हा वाढ
Just Now!
X