13 December 2017

News Flash

किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव २९ नोव्हेंबरपासून रत्नागिरीत

पर्यावरणपूरक जीवनशैलीची गरज अधोरेखित करणारा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या २९ नोव्हेंबरपासून रत्नागिरीत

खास प्रतिनिधी ,रत्नागिरी | Updated: November 9, 2012 6:43 AM

पर्यावरणपूरक जीवनशैलीची गरज अधोरेखित करणारा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या २९ नोव्हेंबरपासून रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि पीपल्स एम्पॉवरिंग मूव्हमेंट (पेम) यांच्यातर्फे सलग दुसऱ्या वर्षी संयुक्तपणे आयोजित या महोत्सवाबाबत सोसायटीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर आणि महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले की, किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लबच्या पुढाकाराने गेली सहा वष्रे हा महोत्सव महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये आयोजित करण्यात येतो. त्यात सुमारे पंचवीस शहरे सहभागी होतात. पण कोकण विभागात हा महोत्सव होत नव्हता. म्हणून गेल्या वर्षीपासून महाविद्यालयाच्या पुढाकाराने तो येथे सुरू झाला आहे. गेल्या वर्षी २२ ते २५ सप्टेंबर या काळात झालेल्या या महोत्सवाला रत्नागिरीकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. त्यामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी, येत्या २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या काळात महाविद्यालयाच्या प्रांगणात हा महोत्सव रंगणार आहे.
दरवर्षी निसर्ग आणि पर्यावरणाशी संबंधित विशिष्ट विचारांच्या प्रसारासाठी हा महोत्सव आयोजित केला जातो. गेल्या वर्षी जैवविविधता या विषयाभोवती तो गुंफण्यात आला होता, तर यंदा ‘पर्यावरणपूरक जीवनशैली’ हे महोत्सवाचे मुख्य सूत्र आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते २९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता महाविद्यालयाच्या राधाबाई शेटय़े सभागृहात महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर २ डिसेंबपर्यंत सकाळ व संध्याकाळच्या सत्रांत मिळून निसर्ग, पर्यावरण, जैवविविधता इत्यादी विषयांवरील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे ४० लघुपट/चित्रपट महोत्सवात सादर होणार आहेत. याचबरोबर निसर्ग फेरी, ‘निसर्गायन’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम, ‘वसुंधरा मित्र’ आणि ‘वसुंधरा सन्मान’ पुरस्कार, छायाचित्र प्रदर्शन इत्यादी भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
महोत्सवामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘जस्ट अ मिनट’ हा खास स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे दुपारच्या सत्रात तज्ज्ञांची व्याख्याने व कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. रत्नागिरीतील भारतीय पर्यावरण व तंत्रज्ञान संस्था, आर्ट सर्कल, रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय, रत्नागिरी फिल्म सोसायटी, मराठी विज्ञान परिषद, निसर्ग मंडळ आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय फिल्म क्लब याही संस्था महोत्सवाच्या संयोजनात सहभागी आहेत. संपूर्ण महोत्सव विनामूल्य राहणार असून त्यासाठी प्रवेशिका महोत्सवापूर्वी चार दिवस उपलब्ध होतील, असे संयोजकांनी जाहीर केले आहे.     

First Published on November 9, 2012 6:43 am

Web Title: kirloskar vasundhara film festival from 29 novembar