संपूर्ण कर्जमाफी, वनजमिनी भूमिहीन आदिवासींच्या मालकीची व्हावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा विशाल मोर्चा मुंबईत धडकला आहे. सोमवारी आझाद मैदानावरुन मोर्चेकरी विधान भवनाला घेराव घालतील.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विधानसभेला घेराव घालण्याकरिता अखिल भारतीय किसान सभेच्या पुढाकारातून नाशिकवरुन निघालेला मोर्चा रविवारी मुंबईत पोहोचला. सोमवारी पहाटे मोर्चेकरी आझाद मैदानात पोहोचले. सुमारे ३० हजार शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्यावतीने राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ जाणार आहेत.

कोण आहेत या शिष्टमंडळात?
शिष्टमंडळात नरसय्या आडम, अशोक ढवळे, अजित नवले, इरफान शेख, सुहास चौधरी, किसन गुजर, रतन बुधर, विलास बाबर, उमेश देशमुख, सावळेराम पवार, आमदार जिवा गावित यांचा समावेश आहे.

सरकारकडूनही मंत्रिगटाची नियुक्ती
शेतकरी मोर्चाचा धसका घेत सरकारने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सहा ज्येष्ठ मंत्र्यांची एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. किसान सभेच्या शिष्ठमंडळाशी चर्चा करण्यासाठी चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख या सहा मंत्र्यांची समिती करण्यात आली.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या? 

* संपूर्ण कर्जमाफी हवी.
* वनजमिनी भूमिहीन आदिवासींच्या मालकीची व्हावी.
* वृद्धापकाळात शेतकऱ्यांना निवृत्ती पेन्शन योजना लागू करावी.
* गुजरात राज्याच्या फायद्याचा नद्याजोड प्रकल्प रद्द करावा.
* सर्व शेतकऱ्यांना नवीन रेशनकार्ड द्यावीत.
* प्रत्येक कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काचे घर मिळावे.
* शेतकऱ्यांना चोवीस तास वीज, पाणी उपलब्ध व्हावे.