News Flash

सांगोल्याच्या डाळिंबांसाठी किसान रेल्वे लाभदायक

किसान रेल्वे सेवेला स्थानिक शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद वाढत असून किसान रेल्वेच्या फेऱ्या आणखी वाढविण्याची मागणीही पुढे येत आहे

सांगोल्याच्या डाळिंबांसाठी किसान रेल्वे लाभदायक
(संग्रहित छायाचित्र)

एजाज हुसेन मुजावर

करोनाच्या संकटात देशातील संपूर्ण अर्थव्यवस्था धोक्यात आली असताना त्यात सर्वाधिक फटका बसला तो शेतीला. टाळेबंदीमुळे शेतीमाल बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यास सुरुवातीच्या टप्प्यात अनेक अडचणी आल्या. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने किसान रेल्वे सेवेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतीमाल दूरच्या बाजारपेठांपर्यंत पोहोच करण्याचा हाती घेतलेला उपक्रम शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना मोठा दिलासा देणारा ठरला आहे. सोलापूर जिल्ह्य़ात सांगोला, मंगळवेढा, माळशिरस, करमाळा आदी भागांतील दर्जेदार डाळिंब, केळी, द्राक्षे, पेरू, पपई आदी फळांना किसान रेल्वेमुळे दिल्ली, कोलकाता व अन्य दूरच्या बाजारपेठा उपलब्ध झाल्या आहेत.

किसान रेल्वे सेवेला स्थानिक शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद वाढत असून किसान रेल्वेच्या फेऱ्या आणखी वाढविण्याची मागणीही पुढे येत आहे. किसान रेल्वेच्या शंभराव्या फेरीचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. सांगोला येथून पश्चिम बंगालमधील शालिमार या २१३२ किलोमीटर इतक्या दूरच्या अंतरावरील किसान रेल्वेला स्वत: पंतप्रधान मोदी यांनी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यामुळे सांगोला भागातील डाळिंब उत्पादक शेतकरी सुखावला आहे.

दूरवरच्या बाजारपेठापर्यंत फळे पोहोचण्यासाठी लागणारा वेळ तुलनेने कमी म्हणजे ४० तासांपर्यंत असल्यामुळे फळे, भाजीपाला ताज्या स्वरूपात ग्राहकांना मिळण्यास मदत होत आहे. पर्यायाने शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेल्या मालाला पूरक दर मिळत असताना दुसरीकडे व्यापाऱ्यांचीही सोय होत आहे.

करोना संकटाचा विचार करून रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांचा शेतीमाल दूर अंतरावरील दिल्ली, कोलकाता, बंगळुरू व इतर महानगरांतील बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवातीला कोल्हापूर येथून मुझफ्फरपूर (बिहार) किसान रेल्वे सांगोलामार्गे रवाना झाली. परंतु कोल्हापूरमधून शेतकऱ्यांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे नंतर किसान रेल्वे मिरज येथून सोडण्यात आली. मात्र तेथूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून माढय़ाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी माढा, सांगोला, करमाळा, मंगळवेढा भागात डाळिंब, केळी व अन्य फळांचे वाढते उत्पादन पाहता सांगोला व करमाळा भागातील जेऊर येथून किसान रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी रेटून धरली. खासदार नाईक-निंबाळकर हे स्वत: रेल्वेशी संबंधित समितीचे सदस्य असल्याने त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला लवकरच यश आले. परिणामी, २० सप्टेंबर रोजी दुसरी किसान लिंक रेल्वे बंगळुरू येथून सांगोलामार्गे दिल्लीच्या आदर्शनगरात पोहोचली. २४ सप्टेंबर रोजी तिसरी किसान लिंक रेल्वे सांगोला येथून हावडा येथे गेली. तर २१ नोव्हेंबर रोजी चौथी किसान लिंक रेल्वे सांगोला येथून व्हाया नागपूर शालिमार (पश्चिम बंगाल) येथे रवाना झाली. पाचवी किसान रेल्वे १५ डिसेंबर रोजी सांगोला येथून दिल्ली (आदर्शनगर) येथे पाठविण्यात आली.

सांगोला हे छोटेसे रेल्वे स्थानक सोलापूर-कोल्हापूर रेल्वेमार्गावर आहे. आतापर्यंत हे रेल्वे स्थानक सहसा चर्चेत आले नव्हते. परंतु किसान लिंक रेल्वेमुळे सांगोला स्थानकाचे नाव देशातील शेती बाजारपेठांमध्ये पोहोचले आहे. हीच गोष्ट जेऊर रेल्वे स्थानकाची म्हणता येईल. सोलापूर-पुणे रेल्वेमार्गावर कुर्डूवाडी ते दौंडदरम्यान जेऊर स्थानक आहे. छोटय़ा पल्लय़ाच्या रेल्वेगाडय़ांचा अपवाद वगळता मोठय़ा पल्ल्याच्या गाडय़ा येथे थांबतही नाहीत. परंतु किसान रेल्वेमुळे जेऊर रेल्वे स्थानकावर मोठय़ा प्रमाणावर शेतीमाल चढविण्यात येत आहे. त्यामुळे छोटेसे जेऊर रेल्वे स्थानक आता शेतीमाल चढविण्याचे जणू ‘हब’ ठरले आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ८९ व्या किसान लिंक रेल्वे फेरीअखेर दहा हजार ५८७ टन इतका शेतीमाल दूरच्या बाजारपेठांपर्यंत पाठविण्यात आला असून यात प्रामुख्याने डाळिंब, केळी, द्राक्षे, पेरू, सीताफळ, पपई, खरबूज आदी फळांसह सिमला मिरची, हिरवी मिरची, टोमॅटो व इतर भाजीपाला व फळभाज्यांचा समावेश आहे. या माध्यमातून रेल्वे प्रशासनाला चार कोटी ९५ लाखांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. किसान रेल्वेच्या शंभराव्या फेरीपर्यंत अवघ्या तीन महिन्यांत सुमारे १७ हजार टन शेतीमालाची वाहतूक झाली आहे. ही किसान लिंक रेल्वे सध्या आठवडय़ातून एक दिवस उपलब्ध आहे. परंतु स्थानिक शेतकऱ्यांकडून मिळणारा मोठा प्रतिसाद पाहता आठवडय़ातून किमान तीन दिवस किसान रेल्वेची सेवा उपलब्ध व्हावी, असा आग्रह होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान लिंक रेल्वेच्या सेवेमुळे शेतकऱ्यांना कसा आधार मिळत आहे, हे सांगताना सांगोला भागातील शेतकऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले आहे. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत कमी अवधीत इच्छित बाजारपेठांपर्यंत शेतीमाल पोहोचवीत असताना दुसरीकडे ज्या बाजारपेठांमध्ये विशिष्ट शेतीमालाची मागणी वाढली आहे, त्या बाजारपेठांमध्ये तो शेतीमाल पाठविण्याची सोय किसान लिंक रेल्वेच्या माध्यमातून झाली आहे. अधूनमधून टोमॅटोचा भाव शेती बाजारात कोसळतो. तेव्हा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागते. परंतु ज्या बाजारपेठेत टोमॅटोला जास्त मागणी आहे, त्या बाजारपेठेत टोमॅटो तात्काळ पाठविणे किसान लिंक रेल्वेमुळे शक्य झाल्याचा दावा पंतप्रधान मोदी करीत आहेत.

सांगोला, मंगळवेढा, तसेच शेजारच्या पंढरपूर, माळशिरस, आटपाडी, जत आदी भागात दर्जेदार डाळिंब उत्पादन होत आहे. लगतच्या कर्नाटकातील अथनी, चडचण (विजापूर) येथेही डाळिंबाचे उत्पादन होते. मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात भोसे, नंदेश्वर, हन्नूर, सलगर, लवंगी ही गावे उत्कृष्ट डाळिंब उत्पादनात आघाडीवर आहेत. माळशिरसच्या पिलीव भागातील डाळिंबही प्रसिद्ध आहेत.

किसान लिंक रेल्वेतून शेतीमाल पाठविताना होणारी आर्थिक आणि वेळेची बचत महत्त्वाची आहे. रस्ते मालवाहतूक आर्थिकदृष्टय़ा अधिक खर्चाची आहे. तर किसान लिंक रेल्वेची सेवा वापरताना वाहतूक खर्चात बचत होते. शिवाय इच्छित बाजारपेठेत शेतीमाल पोहोच होईपर्यंत तो नाश न होता ताज्या स्वरूपात मिळतो. यात शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचा फायदा होत आहे.

सांगोला व इतर भागातील डाळिंब दूरच्या बाजारपेठांमध्ये वेळेवर पोहोचण्यास आणि पर्यायाने शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळण्याची सोय झाली आहे. किसान लिंक रेल्वेची सेवा स्थानिक शेतकऱ्यांना आधार देणारी आहे. त्यामुळे सांगोला भागात किसान रेल्वेला बराच वाव आहे. त्याचा विचार करता किसान लिंक रेल्वे सेवेचा विस्तार होण्याची गरज आहे. सोबत रेल्वेच्या माध्यमातून ‘रो-रो’ सेवाही सुरू झाल्यास त्याचा लाभ फळ उत्पादक शेतकऱ्यांना मिळू शकतो.

-चेतनसिंह केदार, सांगोला तालुकाध्यक्ष, भाजप

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2021 12:00 am

Web Title: kisan railway is beneficial for sangola pomegranates abn 97
Next Stories
1 “आता बघू बाळासाहेबांचा शब्द महत्त्वाचा की सत्तेची लाचारी?”
2 चाकण येथील कंपनीची सहलीची बस पसरणी घाटात उलटली; १५ जण जखमी
3 २०२०ने खूप काही शिकवलं- अजित पवार
Just Now!
X