News Flash

डहाणूतील चिकू उत्पाकांच्या मदतीला ‘किसान रेल्वे’

करोनाकाळात मरगळ आलेल्या व्यवसायाला पुन्हा उभारी

(संग्रहित छायाचित्र)

नीरज राऊत

चिकू या फळाची जलद आणि किफायतशीर दराने वाहतूक करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने डहाणू तालुक्यातील बागायतदारांना मदतीचा हात पुढे केला आहे. ‘किसान रेल्वे’च्या माध्यमातून नुकताच ६० टन चिकू दिल्लीकरिता पाठविण्यात आला असून, २२ तासांत तो तेथील मंडईत दाखल होणार आहे. परिणामी करोनाकाळात मरगळ आलेल्या चिकू व्यवसायाला रेल्वेच्या सहकार्यामुळे पुन्हा उभारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

डहाणू तालुक्यात पाच हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रफळावर चिकूची लागवड केली जाते. येथील चिकूला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. १९७५ ते ८० च्या सुमारास येथील चिकू रेल्वेद्वारे उत्तर भारतात जात असे. मात्र नंतर रेल्वेसेवेऐवजी येथील बागायतदार दिल्ली, आग्रा, जयपूर, जोधपूर, मथुरा इत्यादी ठिकाणी ट्रकद्वारे चिकूची वाहतूक करू लागले.

ट्रकद्वारे चिकूची वाहतूक करण्यासाठी चार ते पाच रुपये प्रति किलो इतका वाहतूक दर आकाराला जातो. तसेच रस्तेमार्गाने फळ दिल्लीला पोहोचण्यासाठी ३० ते ३२ तास लागतात. त्यामुळे कमी वेळेत माल इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी व्यापारी आणि बागायतदारांकडून पर्यायांचा शोध सुरू होता. करोनाकाळात रेल्वेने मालवाहतुकीला दिलेले प्राधान्य लक्षात घेऊन चिकूच्या वाहतुकीसाठी रेल्वेसेवाचा वापर करण्याचा विचार समोर आला.

येथील व्यापारी व बागायतदारांनी महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाच्या माध्यमातून पश्चिम रेल्वेशी संपर्क साधून चिकू वाहतूक करण्यासाठी विशेष मालगाडी पाठवण्याबाबत पाठपुरावा केला.

पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) व वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक यांनी या संदर्भात डहाणू येथे प्रत्यक्षात भेट देऊन बागायतदारांच्या अडचणी समजून घेतल्या आणि विशेष गाडी सोडण्याचा मार्ग सुचविला.

५० टक्के सवलत!

रेल्वे प्रशासनाने सर्व प्रकारच्या फळ व भाजीपाला वाहतुकीसाठी ‘किसान रेल्वेसेवा’ कार्यरत केली असून, वाहतूक खर्चावर ५० टक्के सवलत देण्याचे रेल्वे प्रशासनाने डिसेंबर २०२० मध्ये जाहीर केले होते. त्याअनुषंगाने डहाणू तालुक्यात मोठय़ा प्रमाणात उत्पादित होणारी ढोबळी मिरची, तसेच पालघर तालुक्यातील खाण्याचे पान या उत्पादनांची वाहतूक करण्याबाबत शेतकऱ्यांशी कृषी विभाग संपर्क साधत आहे. करोना टाळेबंदीच्या काळात पालघर येथून पान वाहतुकीसाठी विशेष मालगाडय़ांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याच धर्तीवर इतर भाजीपालादेखील उत्तर भारतात पाठवण्यासाठी येथील शेतकरी व कृषी विभाग प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगण्यात आले.

जलद, कमी खर्चात वाहतूक..

*  डहाणू येथून गुरुवारी पहाटे ‘किसान रेल्वे’च्या माध्यमातून ६० टन चिकू दिल्लीसाठी पाठविण्यात आला. पहाटे २ वाजता डहाणू रोड येथून रवाना झालेली ही विशेष एक्स्प्रेस मध्यरात्रीपूर्वी दिल्लीतील आदर्श नगर येथे पोहोचणे अपेक्षित आहे.

*  डहाणू परिसरात सद्य:स्थितीत दररोज शंभर टन चिकूचे उत्पादन होते. रेल्वेची वाहतूक व्यवस्था कार्यक्षम ठरल्यास दर आठवडय़ात सोमवार व गुरुवारी ‘विशेष चिकू मालगाडी’ सोडण्याचे विचाराधीन असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

*  चिकूच्या हंगामात डहाणू परिसरात २०० ते २५० टन उत्पादन होते. रेल्वे वाहतूक सेवेच्या माध्यमातून देशाच्या विविध भागांत हे उत्पादन पोहोचवण्यासाठी मदत होणार आहे.

*  तब्बल ४० वर्षांनंतर चिकू वाहतुकीसाठी पुन्हा रेल्वेचा वापर केला जाऊ लागल्याने बागायतदारांना जलद गतीने व कमी खर्चात आपले उत्पादन बाजारपेठेत पाठवणे शक्य होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 12:43 am

Web Title: kisan railway to help chiku growers in dahanu abn 97
Next Stories
1 इंदापूर तालुक्यात दुर्मीळ ‘इजिप्शियन गिधाड’!
2 पश्चिम वऱ्हाडातील नेत्यांत टोकाचे मतभेद कायम
3 रायगड जिल्हा क्रीडा संकुल धूळ खात
Just Now!
X