23 November 2017

News Flash

चंद्रकांत पाटील यांनी मखलाशा थांबवाव्यात

राज्यात आजपर्यंत ७१ लाख ४० हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज दाखल केले आहेत.

प्रतिनिधी, अकोला | Updated: September 13, 2017 3:48 AM

भाजप नेते चंद्रकांत पाटील (संग्रहित छायाचित्र)

कर्जमाफीचे ऑफलाइन अर्ज स्वीकारा; किसान सभेचे आवाहन

शेतकरी कर्जमाफीसाठी दहा लाख शेतकऱ्यांनी बनावट अर्ज केल्याचे बेजबाबदार विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. राज्यात आजपर्यंत ७१ लाख ४० हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज दाखल केले आहेत. या अर्जामध्ये दहा लाख अर्ज बोगस आहेत. बोगस अर्ज भरणाऱ्यांनाच केवळ अर्ज भरण्यात अडचण येत आहे, असा शोध पाटील यांनी लावला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात अपशब्द वापरण्याची सत्ताधाऱ्यांची परंपरा चंद्रकांत पाटलांनी सुरूच ठेवली आहे, असा आरोप महाराष्ट्र किसान सभेने केला आहे.

कर्जमाफीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सरकारने ऑनलाइन स्वरूपाची केली आहे. अर्ज भरताना शेतकऱ्यांचा सात बारा, आधार कार्ड, हाताच्या अंगठय़ाचे ठसे व पीक कर्जाची माहिती अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन यंत्रणा अर्जच स्वीकारत नाही. अशा प्रक्रियेमुळे शेतकरी नसलेली कोणतीही ‘बोगस’ व्यक्ती अर्जच भरू शकत नाही अशी वस्तुस्थिती आहे. असे असताना दहा लाख लोकांनी असे ‘बोगस’ अर्ज भरले आहेत, असे बेजबाबदार विधान चंद्रकांत पाटलांनी केले आहे. शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या या विधानाचे अत्यंत संतापजनक पडसाद उमटले असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केली.

सरकारने कर्जमाफीसाठी अनेक जाचक अटी शर्थी लागू केल्या आहेत. सरकारच्या या अटी शर्तीमध्ये न बसल्याने लाखो शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार हे उघड आहे. अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांपकी अटी-शर्तीमध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ‘अपात्र’ असल्याचे म्हणणे समजू शकते. मात्र अशा शेतकऱ्यांना ‘बोगस’ म्हणून चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या मनात शेतकऱ्यांविषयी कशा प्रकारे तिरस्कार आहे हेच दाखवून दिले आहे.

अर्ज भरण्याच्या जटिलतेमुळे अनेक शेतकऱ्यांना अद्यापही अर्ज दाखल करता आलेले नाहीत. अर्ज भरण्यासाठी आता केवळ चारच दिवसांची मुदत शिल्लक आहे. अनेक शेतकऱ्यांचे आधार कार्ड रिजेक्ट झालेले आहेत. अनेकांकडे आधार कार्ड नाहीत. परराज्यातील आधार कार्डमधील नंबर अर्ज भरताना नमूद होत नाहीत. अनेक शेतकऱ्यांच्या बोटाचे ठसे उमटत नाहीत.

आधार कार्डमधील चुका दुरुस्त होण्यास वेळ लागत असल्याने मुदतीत अर्ज भरण्याच्या शक्यता मावळू लागल्या आहेत. सव्‍‌र्हर डाऊन असल्यानेही अर्ज भरताना अडचणी येत आहेत. अशा अनेक अडचणी असताना केवळ बोगस अर्ज भरणारांना अडचणी येत आहेत असे म्हणून या अडचणी असलेले सर्वच शेतकऱ्यांना चंद्रकांत पाटीलांनी बोगस ठरवून टाकले आहे. त्यांचे हे विधान या सर्व शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता केलेल्या विधानाबद्दल चंद्रकांत पाटलांनी शेतकऱ्यांची माफी मागावी व उर्वरित सर्व शेतकऱ्यांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारून आधार कार्ड व इतर पूर्ततेसाठी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेने केली आहे.

First Published on September 13, 2017 3:48 am

Web Title: kisan sabha chandrakant patil farmers online application farmers loan waiver