संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी किसान सभेने २० फेब्रुवारी रोजी लाँग मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी मुंबईत काढलेल्या शेतकऱ्यांच्या लाँग मार्चवेळी मागण्या मान्य होऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने नाशिक ते मुंबई असा १८० किलोमीटरचा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. गतवर्षीपेक्षा यंदा शेतकऱ्यांची संख्या दुप्पट असेल, अशी माहिती किसान सभेने दिली. हा लाँग मार्च २७ फेब्रुवारी रोजी मुंबईत धडकणार आहे.

गेल्या वर्षी लाँग मार्च मुंबईत धडकल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या; पण त्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याची भावना वाढल्यामुळे हा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. लाँग मार्चमध्ये या वेळी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देऊ नये हा मुद्दाही घेण्यात आल्याची माहिती किसान सभेचे आमदार जे. पी. गावित यांनी दिली. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, डॉ. डी. एल. कराड या वेळी उपस्थित होते. लाँग मार्चमध्ये नाशिक, ठाणे, पालघर, पुणे या जिल्ह्यांबरोबरच मराठवाडा व विदर्भातून शेतकरी सहभागी होणार आहेत.