दारात २० ते ३० टक्के वाढ; बाजारात चिनी बनावटीचेही पतंग

विरार : मकरसंकांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मकरसंक्राती आणि पतंग असे समीकरण झाले असल्याने, संक्रांतीच्या काही दिवसांपासूनच आकाशात रंगबिरंगी पतंग दिसत आहेत. वसईच्या बाजारपेठाही विविधरंगी पतंगांनी सजल्या आहेत.

वसई-विरारमध्ये पतंगप्रेमींची संख्या मोठय़ा प्रमाणत आहे.  आठवडाभरापासूनच वसई -विरारमध्ये दुकाने सजली आहेत. पतंग आणि मांजा घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी दुकांनावर दिसायला लागली आहे.  मागील वर्षीच्या तुलनेने या वर्षी सर्वच आकाराच्या पतंग आणि मांज्याच्या  दारात २० ते ३० टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. असे असले तरी, वसई-विरार मध्ये पारंपरिक पद्धतीबरोबर चिनी बनावटीच्या अनेक पतंग पाहायला मिळत आहे.

कागदी पतंगासह पीकॉक, रेनबो, टायगर, ड्रॅगन, इगल असे प्राण्यांच्या आकाराच्या विविध पतंग उपलबध आहेत. त्यांची किंमत ५० रुपयांपासून ५०० रुपयापर्यंत आहे. कागदाचे पारंपरिक पतंगही यावेळी विविध रंगसंगतीने आणि वेगवेळ्या आकाराने बाजारात दाखल झाले आहेत. त्याची किंमत ५ रुपयांपासून २५० रुपयापर्यंत उपलब्ध आहेत.  अनेक दुकानांमध्ये चित्रपट कलावंत, क्रिकेटपटू आणि राजकारणी यांची छायाचित्रे असलेले पतंग पाहायला मिळत आहे.  पब्जी या ‘गेम’चे चित्र असलेले आणि विविध कार्टून कॅरॅक्टरची चित्रे असलेले पतंग बाजारात उपलब्ध आहेत. काही ठिकाणी पॅराशूटसाठी वापरण्यात येणाऱ्या कापडापासून पतंग उपलब्ध आहेत. हे पतंग ३० ते ४० रुपयांपासून उपलब्ध आहेत. बंदी असलेले प्लास्टिक पतंगही अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत.

बंदी असलेल्या मांजाचीही विक्री

बंदी असतानाही चायनीज आणि नायलॉन मांजाची वसईच्या बाजारपेठांमध्ये विक्री सुरू आहे. पक्ष्यांसह मानवी जिवाला धोकादायक असलेल्या या मांजावर राज्य सरकारने बंदी घातलेली आहे. पण ही बंदी झुगारून वसई-विरारमध्ये खुलेआम विक्री आणि साठवणूक सुरू आहे. या मांजामुळे दरवर्षी अनेक पक्षी आणी नागरिक जखमी होत असतात. तरीही हा मांजा वसई आणि आसपासच्या परिसरात खुलेआम विकला जात आहे. त्याची फिरकीची किंमत ६० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत आहे.