22 April 2019

News Flash

उज्ज्वल निकम एका खटल्याच्या सुनावणीसाठी किती मानधन आकारतात, वाचाल तर थक्क व्हाल

उज्वल निकम यांचा एक दिवस कोर्टात उभं राहण्याचा खर्च किमान ५० हजार रुपयांच्या घरात असून ते एकेका तासाच्या सल्ल्यासाठी १५ हजार रुपये आकारतात

अॅड. उज्ज्वल निकम (संग्रहित छायाचित्र)

विश्वास पुरोहित

प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये सरकारी बाजू मांडणारे वकील उज्ज्वल निकम यांना एका खटल्याच्या सुनावणीसाठी किती मानधन मिळते, हे आता समोर आले आहे. निकम यांची तळेगाव दाभाडे येथील २०१६ मधील खून खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली असून या खटल्याच्या सुनावणीसाठी निकम यांना प्रतिदिन ५० हजार रुपये इतके मानधन दिले जाणार आहे. याशिवाय विचारविनिमय शुल्क, हॉटेल लॉजिंग बोर्डिंग आणि प्रवास खर्चासाठी अतिरिक्त पैसे दिले जाणार आहेत.

तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन बाळासाहेब शेळके यांची ऑक्टोबर २०१६ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या खटल्यात न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. निकम यांना या खटल्यासाठी किती शुल्क द्यावे हे नुकतेच निश्चित करण्यात आले आहे.

३१ जुलै २०१८ रोजी महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. निकम यांना या खटल्यातील सुनावणीसाठी व्यतित केलेल्या प्रत्येक दिवसासाठी शुल्क म्हणून ५० हजार रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्याखेरीज विचारविनिमय व सल्ला या कारणांसाठी प्रतितास १५ हजार रुपये देण्याचे सरकारने मान्यकेले आहे. खटल्याच्या कामकाजासाठी करावे लागणाऱ्या हॉटेल लॉजिंग व बोर्डिंगपोटी प्रतिदिन ५ हजार रुपये आणि प्रवास खर्चाअंतर्गत रेल्वेचा प्रत्यक्ष प्रवास खर्च देण्यात येणार आहे. या शुल्काव्यतिरिक्त निकम यांना अन्य कुठल्याही प्रकारचे शुल्क देण्यात येणार नाही, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. हा खर्च पोलिसांच्या व्यावसायिक सेवा यासाठी दिल्या जाणाऱ्या निधीतून भागवला जाईल.

First Published on August 1, 2018 6:20 pm

Web Title: know the ujjwal nikam fees for one hearing of talegaon murder case