मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावली असून २२ ऑगस्टला हजर राहण्याचा आदेश दिला आहे. याच पार्श्वभुमीवर मनसेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत २२ तारखेला राज ठाकरेंसोबत ईडी कार्यालयाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांनी कोणीही ईडीच्या कार्यालयाबाहेर येऊ नये अशी सक्त ताकीद दिली आहे. केसेस आणि नोटीसांची मला सवय आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. कोणी कितीही डिवचायचा प्रयत्न झाला तरी शांतता राखा असा स्पष्ट आदेश राज ठाकरेंनी दिला आहे.

“राजगडावर आमची बैठक पार पडली होती. ईडीच्या कार्यालयाबाहेर जावं असं आवाहन यावेळी कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांना करण्यात आलं होतं. पण राज ठाकरेंसोबत आमची बैठक झाली असता कोणीही ईडीच्या कार्यालयाबाहेर येऊ नये असा आदेश त्यांनी दिला आहे. तशी सक्त ताकीदच त्यांनी दिली आहे. शांततेत हे प्रकरण पुढे न्यायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे”, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. सामान्य लोकांना त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे सुपूत्र उन्मेष जोशी यांनादेखील याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली असून सोमवारी ईडीकडून पाच तास त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान आज मंगळवारी राज ठाकरे यांचे भागीदार आणि निकटवर्तीय राजन शिरोडकर ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. उन्मेष जोशीदेखील ईडी कार्यालयात हजर असून राजन शिरोडकर आणि त्यांची एकत्र चौकशी केली जात आहे.

‘इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अॅवण्ड फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस’ने (आयएल अॅाण्ड एफएस) कोहिनूर सीटीएनएल कंपनीत केलेल्या गुंतवणुकीत कंपनीला झालेला तोटा आणि कोहिनूर सीटीएनएल इन्फ्रास्ट्रक्चरने कंपनीचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज यांना नोटीस बजावण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली असून २२ ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. ‘आयएल अॅण्ड एफएस’कडून कोहिनूर सीटीएनएल कंपनीने घेतलेल्या कर्जप्रकरणात राज यांच्या सहभागाबाबतची चौकशी ‘ईडी’ करीत आहे. दादर येथील कोहिनूर मिल नं. तीन ४२१ कोटींना खरेदी करून तेथे ‘कोहिनूर स्वेअर’ विकसित करण्यासाठी ‘कोहिनूर सीटीएनएल इन्फ्रास्ट्रक्चर’ ही कंपनी उन्मेष जोशी यांनी स्थापन केली होती. राज, उन्मेष आणि बांधकाम व्यावसायिक राजन शिरोडकर यांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. परंतु नंतर राज यांनी या कंपनीतून अंग काढून घेत समभागही विकून टाकले होते. या संपूर्ण व्यवहाराची ‘ईडी’ चौकशी करत आहे.

‘कोहिनूर सीटीएनएल’मध्ये ‘आयएल अॅनण्ड एफएस’ कंपनीने कर्जस्वरूपात ८५० कोटी रुपये गुंतवले होते. या व्यवहारात कंपनीला तोटा झाला. याप्रकरणी आणि ५०० कोटींच्या मालमत्ता प्रकरणात ‘ईडी’ने गेल्या आठवडय़ातच मुंबईतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.