तुळजापूरच्या तुळजाभवानीची सर्वात मोठी भाविक संख्या असणाऱ्या कोजागरी पौर्णिमेस बुधवारी मध्यरात्रीपासून २४ तासांत सुमारे १३ लाख भाविकांनी दर्शन घेतले. देवीची साडेतीन शक्तिपीठातील भाविकांची ही सर्वाधिक गर्दी असणारी यात्रा असून दोन दिवस देवीच्या दर्शनाच्या रांगा अखंड चालू आहेत.
तुळजाभवानीचे शारदीय नवरात्र विजयादशमीदिनी सीमोल्लंघनाने पूर्ण झाले, तेव्हा देवीने श्रमनिद्रा घेतली; ही निद्रा मंगळवारी मध्यरात्री संपल्यानंतर विधिवत देवीची मूर्ती मुख्य सिंहासनावर प्रतिस्थापित करण्यात आली. मध्यरात्रीनंतर एक वाजता चरणतीर्थ पूजेनंतर हा विधी पार पडला. नगरच्या तेल्याच्या पलंगावर देवीची ही श्रमनिद्रा चालू होती. देवी उठविल्यानंतर दही-दुधाचे हजारो अभिषेक पार पडले. पुन्हा सकाळी ७ वाजता अभिषेक करण्यात आले. सकाळचे अभिषेक ११ वाजता पूर्ण होताच धुपारती व नित्योपचार पूजा झाली. देवीचे भोपे पुजारी यांनी देवीचा साजशृंगार केला.
मध्यरात्रीनंतर एकपासून दर्शन सुरू होते. मंदिरातील दर्शनमंडपाचे चारही मजले भाविकांनी खचाखच भरले होते. कडक सुरक्षा व्यवस्था व दर्शन मंडपामुळे ताशी २५ हजार भाविकांची दर्शनाची साखळी दिवसभर सुरू होती. बसस्थानक विस्तारीकरणामुळे स्थानक परिसर व नवे स्थानक या भागात लाखो भाविकांची गर्दी असूनही कोंडी झाली नाही. एकाच ठिकाणी भाविकांची गर्दी होऊ नये, या साठी एस. टी. महामंडळाने सूतगिरणीवर कर्नाटक व आंध्रातील भाविकांची वाहने उभी करण्याची व्यवस्था केली होती. वडगाव गावाजवळ लातूर मार्गावरील वाहने उभी केली जात होती. सोलापूर मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद होती. त्यामुळे सुमारे १० किलोमीटर परिघातून भाविकांना सुलभपणे तुळजापुरात आणण्याची व्यूहरचना करता आली. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी तुळजापुरात तळ ठोकून प्रशासनाचे नियोजन केले. यापूर्वी बठकांतून घेतलेल्या निर्णयांची पूर्तता करण्यात एस. टी. महामंडळ, पोलीस विभाग, पुजारी, नगरपालिका, वीज वितरण कंपनी, आरोग्य विभाग यांनी लक्ष घातल्याने डॉ. नारनवरे यांचे नियोजन यशस्वी ठरले. पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. राजीव बुबणे यांनी आपल्या मुख्याधिकारी कार्यकाळातील नवरात्र व पौर्णिमेतील सर्वोत्तम कामगिरी बजावल्याचे जाणवले.
सोमवारी मध्यरात्रीपासून तुळजापुरात पायी येणारे भाविक दाखल झाले. या भाविकांना सुहाना मसालाच्या वतीने नगराध्यक्षा जयश्री कंदले, माजी नगराध्यक्षा विद्या गंगणे, उपनगराध्यक्ष गणेश कदम, काँग्रेस नेते माधवराव कुतवळ, सुभाष शेटे, वैभव शेटे, राहुल शेटे यांनी मसाला दूध वितरित केले. सर्व मार्गावर अल्पोपहार, केळी, दूध, दही भात, डाळभात असे भोजन देण्यात आले. कर्नाटकातील बंडाप्पा काशाप्पा यांनी पाणी-भोजनाची मोफत सोय केली. याप्रमाणे सुमारे ८-१० हजार मदतकेंद्रे उभारण्यात आली. दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांकडून होणाऱ्या अन्नदानामुळे लाखो भाविकांना दिलासा मिळाला.
कर्नाटक व आंध्रातील सुमारे १० लाख भाविकांसह पश्चिम महाराष्ट्रातूनही ४ लाखांवर भाविकांनी पायी येऊन दर्शन घेतले. ‘आई राजा उदो’च्या गजराज डोक्यावर गाठोडे व बॅगा घेऊन पावले टाकीत तुळजापुरात आल्यानंतर भाविकांच्या आनंदाला उधाण येत होते. सोलापूर ते तुळजापूर अंतर सुमारे १० तास, तर हैदराबाद, जहिराबाद, बीदर ,भालकी, सदाशीवपेठ, कामठाणा, संगारेड्डी भागातून गेल्या ५ दिवसांपासून चालत येणारे लोक बुधवारी सकाळी तुळजापुरात दाखल होत होते. तुळजापुरातील सर्व मार्ग भाविकांनी फुलून गेले आहेत. भाविकांच्या व्यवस्थेसाठी तुळजापुरात सर्व खात्यांकडून व्यवस्था करण्यात आली. सकाळी अकरापर्यंत ८ लाखांवर भाविक दर्शन करून बसने बाहेर पडले, तर दुपारी चापर्यंत १२ लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले. कर्नाटकाच्या २५० बसेस व महाराष्ट्राच्या ४५० बसेस या काळात भाविकांना परत घेऊन जात होत्या. याशिवाय अवैध प्रवासी व्यवसाय करणाऱ्या ६०० गाडय़ा युद्धपातळीवर कार्यरत असल्याचे चित्र होते.
या वर्षी भवानीरस्ता अतिक्रमणमुक्त करण्यात आल्याने या मार्गावर गर्दी व कोंडी झाली नाही. दुचाकी वाहनांना प्रवेशबंदी व रस्त्यावर गाडय़ा पार्क करण्यावर बंदी आदेशाची कडक अंमलबजावणी केल्याने भाविकांनी तुळजापुरात मोकळा श्वास घेतला. इतर यात्राकाळात तुळजापुरात होणारी वाहतुकीची कोंडी या वेळी न झाल्याचे श्रेय जिल्हाधिकारी नारनवरे व पोलीस अधीक्षक त्रिकुंडे यांच्या चोख नियोजनाला दिले पाहिजे. पालकमंत्री चव्हाण व नगराध्यक्षा कंदले यांनी आचारसंहितेमुळे प्रत्यक्ष यात्रेत उतरले नसले, तरी त्यांनी यात्रेची विचारपूस केली.