भटक्या जनावरांच्या उच्छादाबाबत वारंवार तक्रारी करूनही कबनुर (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरीकांनी गुरुवारी मृत डुक्करं ग्रामपंचायतीत आणून टाकली. याप्रकारानंतर ग्रामसेवक आणि नागरीकांमध्ये शाब्दिक वाद झाला.

इचलकरंजीनजीक कबनूर गावात आझादनगरमध्ये मुजावरपट्टी नामक खुला भुखंड आहे. या भुखंडालगत मुतारी असून त्या ठिकाणची गटारही तुंबलेली  आहे. परिणामी मुतारी आणि गटारीचे सांडपाणी खुल्या भुखंडावर साचून दलदल निर्माण झाल्याने डासांचा प्रार्दुभाव वाढला आहे. त्या ठिकाणी मेलेली भटकी कुत्री, डुक्करही पडलेली असतात. परिणामी डेंग्यू, चिकन गुनिया यासारखे साथीचे आजार पसरत असल्याने ग्रामपंचायतीकडं नागरिकांनी वारंवार तक्रारीही केल्या आहेत.

आज सकाळी पुन्हा त्या भुखंडावर मेलेले डुक्कर निदर्शनास आले. यावर नागरीकांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधला. मात्र सहा तास कोणतीच कार्यवाही न झाल्याने संतप्त नागरीकांनी मृत डुक्करे ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच यांच्या दालनात आणून टाकली. यावेळी नागरीक आणि ग्रामसेवक यांच्यात शाब्दीक वाद झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर ग्रामसेवकांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळीही नागरीकांनी ग्रामसेवकांशी हुज्जत घातली तर काही महिलांनी डुक्करांच्या मालकाच्या अंगावर धाऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच शिवाजीनगर पोलीसांनी घटनास्थळी येऊन हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले. त्यानंतर ग्रामसेवकांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्‍वासन दिल्याने नागरीक परतले.