कोल्हापूर : दोन महिन्यांपूर्वी सुरु झालेली कोल्हापूरची विमान सेवा बंद पडली आहे. पावसामुळे विमानसेवा बंद असल्याचे तांत्रिक कारण पुढे केले जात आहे. मात्र विमानसेवा देणाऱ्या ‘एअर डेक्कन’ विमान कंपनीने कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्याचे वेतन थकवले असल्याचे खरे कारण असल्याची माहिती पुढे येत आहे. यामुळे या कंपनीला काळ्या यादीत टाकून तिची देशभरातील सेवा बंद करण्यात यावी, अशी मागणी संसदेत करणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी सांगितले. ‘इंडिगो’ कंपनीची विमानसेवा कोल्हापूरला मिळण्याची शक्यता असून त्यास केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी संमती दर्शवली असल्याचेही त्यांनी नमूद केले .

उडान योजनेअंतर्गत यावर्षी एप्रिल महिन्यात  कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा आठवडय़ातून तीन दिवस सुरु होती . गेल्या  तीन दिवसांपासून ती बंद पडली  आहे. तांत्रिक अडचण असल्याचे सांगून ही विमानसेवा बंद करण्यात आली आहे.  विमानसेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कोल्हापूर विमानसेवा सुरू राहण्यासाठी पाठपुरावा करणारे  खासदार महाडिक यांनीही विमानसेवा बंद झाल्याबद्दल नाराजी दर्शवली . ते म्हणाले, की विमानसेवा देणाऱ्या ‘एअर डेक्कन’ विमान कंपनीशी संपर्क  साधत असून योग्य प्रतिसाद मिळत नाही . या कंपनीने येत्या १५  दिवसात विमानसेवा सुरु केली नाही तर तिला काळ्या यादी मध्ये टाकण्यात यावे अशी मागणी लोकसभेत करणार आहोत . नवा पर्याय म्हणून  ‘इंडिगो कंपनी’तर्फे ही सेवा सुरु केली जाणार असून मंत्री प्रभू यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. ही सेवा ‘उडान’मध्ये नसल्याने प्रवाशांना व्यावसायिक दराने प्रवास करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.